शिक्रापूर : शिक्रापुरात एकाच्या घरात तिघांनी पैशाचा पाऊस पाडून तिघा तोतया पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून पैसे जप्त करत पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, नागरिकांनी पाठलाग करत तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विश्वास भगवान घाग (वय ५३, रा. गौरीवाडा कल्याण ठाणे), निलेश ओमप्रकाश सावंत (वय ५३, रा. डोंबिवली पूर्व ठाणे), बशीर इब्राहीम शेख (रा. कासरा ठाणे), अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शिक्रापूर येथील संतोष भुजबळ याला तिघांनी पैशाचा पाऊस पाडतो, असे म्हणून विश्वासात घेऊन आळेफाटा येथे बोलावून घेत पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यांनतर चौघे शिक्रापूर येथे आले. त्यांनी बुधे वस्ती येथे एका घरात तिघांनी बसून पाच लाख रुपये तसेच काही वस्तू ठेवत विधी सुरु केला. याचवेळी पोलिसांच्या वेशातील एका तोतया पोलिसासह तिघांनी घटनास्थळी धाड टाकत आम्ही पोलीस आहे, जादूटोणा करता का, पैशाचा पाऊस पाडता का, असे म्हणून पैसे आणि तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील कारमधून पलायन केले. त्यांनतर फसवणूक झालेल्या युवकाच्या मित्रांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करीत चाकण गाठले. चाकणमध्ये त्यांची कार अडवली असता त्यांची झटापट सुरु होऊन तिघेजण पैसे घेऊन पळून गेले. त्यांनतर चाकण येथील म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घाडगे, अमोल माटे यांनी तिघांना ताब्यात घेऊन घटनाक्रम समजावून घेत तिघांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी सर्व विचारपूस करीत वरिष्ठांच्या आदेशानुसार हवलदार अमोल नलगे, राकेश मळेकर, नवनाथ केंद्रे यांनी तिघांना ताब्यात घेत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे घेऊन जात त्यांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले. आळेफाटा पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे.