पुणे जिल्हा : आमदार जगतापांची सासवडला पदयात्रा

सुपूत्र म्हणून सासवडकरांनी दिला एकमुखी पाठिंबा
सासवड – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार (काँग्रेस) आमदार संजय जगताप यांना मतदारसंघातून पाठिंबा मिळत आहे. गावचा सुपुत्र म्हणून सासवड परिसरातील नागरिकांनी आमदार जगताप यांना एकमुखी पाठिंबा दिला असून विविध संघटनांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे.
सासवड शहरातून आमदार संजय जगताप यांची पदयात्रा झाली. यावेळी आमदार जगताप यांच्या मातोश्री आनंदीकाकी जगताप, प्रचारप्रमुख सुदाम इंगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सासवड नगरपालिकेचे आजीमाजी पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सासवडकर नागरिक उपस्थित होते.
महिला व युवकांची संख्या अधिक होती. दिवंगत लोकनेते, सासवडचे शिल्पकार चंदूकाका जगताप यांचा विकासाचा वारसा आमदार संजय जगताप समर्थपणे चालवीत आहेत. मतदारसंघात मागील पाच वर्षे लोकप्रतिनिधी आणि त्याआधी अनेक वर्षांपासून विविध संस्थात्मक, सामाजिक लोकप्रतिनिधी म्हणून केलेली विविध विकासकामे, गावोगावात त्यांनी निर्माण केलेला संपर्क व येथील नागरिकांशी तयार केलेले आपुलकीचे नाते या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
खासदार कोल्हेंनी साधला व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे संवाद
तुमच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजीराजांनी महाराष्ट्राला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिले. तिच स्वाभिमानाची लढाई महाराष्ट्र लढत असताना आमदार संजय जगताप हे स्वाभिमानाने पुरंदर-हवेलीचे नेतृत्व करतात आणि त्यासाठीच पुन्हा एकदा त्यांना विधानसभेवर आमदार म्हणून आपण सर्वांनी निवडून द्यावे. त्यांची निशाणी आहे हाताचा पंजा. हा पंजा विकासाचा, हा पंजा मदतीचा आणि हा पंजा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे. आपल्या मतांचा आशिर्वाद आमदार संजय जगताप यांच्या पाठिशी उभा करा असे आवाहन, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे जनतेला केले.





