Pune District : रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार?

जेऊर फाटा येथे रेल्वे भुयारी मार्गात पाझरतेय पाणी
वाल्हे – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत नीरा-जेऊर रस्त्यावरील पुणे- मिरज लोहमार्गावरील जेऊर फाटा (ता. पुरंदर) येथे रेल्वे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने भुयारीमार्ग केल्याचा आरोप जेऊर, मांडकी भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या भुयारीमार्गात सुरवातीच्या काळात पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली नव्हती. त्यामुळे सुरवातीचे काही वर्षे इलेक्ट्रीक पंप बसवून पाणी उपसावे लागत होते. नंतरच्या काळात रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली खरी; परंतु चुकीच्या नियोजनामुळे पाऊस नसतानाही या मार्गात पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मागील काही वर्षांपासून पुणे-मिरज या लोहमार्गाचे विस्तारीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, विविध कारणांमुळे कायमच वादात राहिलेले हे काम दर्जाबाबतसुद्धा निकृष्ठ असल्याचे समोर येत आहे.कोट्यावधी रूपये खर्चुन पुणे-पंढरपुर पालखी महामार्गालगत जेऊर फाट्यानजिक रेल्वे क्रसिंग गेट बंद करून त्याएवजी पुणे-मिरज या लोहमार्गाचे विस्तारीकरणादरम्यान भुयारी मार्ग सुरू केला; परंतु भुयारीमार्ग बनविताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे पावसाविरहित या भुयारी मार्गामध्ये पाणी साचत असल्याने स्थानिकांसह प्रवाशांना एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.
रस्त्यावरही खड्डे
पाण्याचा निचरा होत नसल्याने गेले अनेक दिवसांपासुन प्रवाशांना पाण्यातुनच जावे लागत आहे. सततच्या पाण्यामुळे रस्त्याला देखील खड्ड्यांचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने याचा मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागत आहे.
उपाययोजना तातडीने करा
भुयारी मार्गामध्ये पाणी साचण्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असून थोडाजरी पाऊस झाली तरी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. या पाण्यातुन वाहने चालवणे देखील जिकीरीचे होत असुन या पाण्याचा कायमचा निचरा करण्याची उपाययोजना तातडीने करण्यात यावी तसेच रस्त्याला पडलेले खड्ड्यांची दुरूस्ती करुन मार्ग सुस्थितीत वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कुमार धुमाळ, सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे यांनी केली आहे.





