उमेदवारांचे स्वप्न मशिनबंद : मतदारसंघात 68.56 टक्के मतदान रामचंद्र सोनवणे राजगुरुनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्टया जिल्ह्याचे लक्ष वेधणारा विधानसभा मतदारसंघ आहे. यावेळीच्या निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या दुरंगी लढत झाली आहे. काटे की टक्कर काय असते ते या मतदारसंघात निकालानंतर समजणार आहे. मात्र बहुजन समाज पार्टीचे उमेदवार किती मतदान घेणार आणि कोणाला धोका देणार हे गणित पडणार्या उमेदवाराचे कारण बनणार आहे. एकीकडे तालुक्यात मंत्रीपदाचे स्वप्न पहिले जात आहेत तर दुसरीकडे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे तालुक्यातील वर्षास्व संपवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन लढा देत आहेत. त्यांचे हे स्वप्न दोन दिवस पेटीबंद असले तरी येत्या शनिवारी (दि. 23) हे चित्र स्पष्ट होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मतदानाचा केवळ एक टक्का वाढला आहे तर त्याच प्रमाणात मतदार संख्याही वाढली आहे. खेड तालुक्यात 1,93, 719 पुरुष मतदार, 1,82,892 स्त्रीयांचे मतदान तर 12 इतर असे 3,76,623 मतदार संख्या आहे त्यापैकी 1,38,146 पुरुषांनी, 1,20,062 स्रियांनी आणि 4 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 71.31 टक्के पुरुषांनी तर 65.65 टक्के स्त्रियांनी मतदान केले. महिलांचे मतदान यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. लाडकी बहीण योजनेचा खेड-आळंदी विधानसभेत फॅक्टर चालला का नाही. हे निकालानंतर समजेल तोपर्यंत मात्र तालुक्यात मंत्रिपद आणि आमदार होण्याची स्वप्न अनेकजण पाहत आहेत. आमदार मोहिते पाटील यांचे मंत्रिपदाचे स्वप्न तर बाबाजी काळे यांचे आमदार होण्याचे स्वप्न खेड-आळंदी विधानसभाह मतदारसंघातील मतदार करणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोकसभेला महाविकास आघाडीने खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून 43 हजारपेक्षा अधिक मताधिक्य खासदार डॉ कोल्हे याना दिले होते.यावेळी मात्र मतदार महायुती की महाविकास आघाडीला विजयी करणार हे चित्र जरी निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी लोकसभेला मताधिक्य मिळाल्याने महाविकास आघाडीकडे विधानसभेला इच्छुकांची संख्या वाढली होती. उमेदवार वाढल्याने बंडखोरीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र एकास एक लढत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. प्रत्यक्ष निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. मतदार आणि नागरिकांच्या जोरदार उपस्थितीच्या प्रचार सभा आणि प्रचारात टोकाचे आरोप झाले. निवडणुकीच्या काही तासांपूर्वी मतदारांना झालेले लक्ष्मीचे दर्शन तसेच मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार? निकाल हाती येईपर्यंत कोण विजयी होणार? इथं एवढे तिथे तेवढे या गणितावर चौकाचौकांत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मतदानाच्या एकूण आकडेवारीत महीला मतदारांची संख्या मोठी व लक्षणीय आहे. लाडकी बहिण योजनेचा हा परीणाम असावा असे अंदाज आहेत. दुसरीकडे महिलांसाठी देवदर्शन यात्रेचा फायदा उमेदवारांना होणार का? हे मतदान नेमके कुणाकडे झुकले? यावर विजयाची गणितं बदलणार आहेत.आमदार दिलीप मोहिते पाटील आणि प्रतिस्पर्धी बाबाजी काळे यांनी दोन्ही उमेदवारांनी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे तर यावरून अनेकांनी एकमेकांशी पैजा लावल्या असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारांच्या ठरलेल्या उजव्या बाजू दिलीप मोहिते पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस,अजित पवार ) वैयक्तिक मोठा जनसंपर्क मुख्यमंत्री लाडकी बहीण राष्ट्रवादी पक्षाचे मतदान राष्ट्रवादी (अजित पवार गट)महायुती भाजप सेना आरपीआय व घटक पक्ष मतदान विकास कामे लक्ष्मी दर्शन बाबाजी काळे (शिवसेना, उबाठा) मोठा नातेसंबंध महिलांसाठी देवदर्शन शिवसेना पक्षाचे मतदान महाविकास आघाडी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शरद पवार), काँग्रेस व मित्र पक्ष मतदान तालुक्यातील सर्व पक्षीय नेते यांची साथ लक्ष्मी दर्शन मतदानाचा टक्का वाढविण्यात अपयश खेड-आळंदी 197 विधानसभा मतदार संघात लोकशाहीचा उत्सव मोठ्या आनांदात साजरा झाला पहिल्यांदाच निवडणुकीच्या वातावरणात खेड तालुका शांत राहिला आहे. प्रशासनाची ही जमेची बाजू असली तर जनजागृती करूनही मतदानाचा टक्का वाढविण्यात त्यांना अपयश आपले असल्याचे मतदानावर स्पष्ट झाले आहे. मतपेट्या पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतर राजगुरूनगर जवळील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुल येथे मतदान पेट्या (मशीन) ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी मोठा आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंद मत पेट्या मतमोजणीसाठी शनिवार (दि. 23) बाहेर येतील. मतमोजणीद्वारे निकाल समोर येणार आहे. निकालातून महायुतीचे उमेदवार, आमदार दिलीप मोहिते पाटील की महा विकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचे राजकीय भविष्य स्पष्ट होणार आहे.