पुणे जिल्हा : अनुदानापासून दूध उत्पादक शेतकरी वंचित

वडापुरी : गाईच्या दुधाला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळून तो तोट्यात जात असल्याने मागील वर्षभरापासून सातत्याने दूध उत्पादक कुठे ना कुठे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2024 मध्ये राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांना गाईचे दूध पुरवठा करणार्या शेतकर्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
ही अनुदान योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी होती. त्यानंतर या योजनेस 10 मार्चपर्यंत मुदतवाढही देण्यात आली; परंतु या योजनेच्या अत्यंत किचकट अटी-शर्तीमुळे अनुदान मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त दुधाचे उत्पादन घेतले जाते; परंतु या अनुदानापासून अनेक दूध उत्पादक वंचितच राहिले आहेत.
फार कमी दूध उत्पादकांना अनुदान मिळाले, तेही बर्याच विलंबाने! त्यानंतर पुन्हा जून 2024 मध्ये गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. या घोषणेला देखील दोन महिने झाले तरी अनुदान देण्याबाबत शासन पातळीवर काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे दूध अनुदान मिळणार की नाही, अशी शंका उत्पादकांना आता लागली आहे.
वाढता उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणार्या कमी दराने संतप्त दूध उत्पादक आंदोलन करीत असताना त्यांना केवळ अनुदानाचे गाजर दाखवून वारंवार वेळ मारून नेण्याचे काम राज्य शासन करीत आहे. त्यामुळे संतप्त दूध उत्पादकांकडून ’मतदानावर डोळा ठेवून आणलेल्या लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र घामाचे दाम मागणार्या शेतकर्यांसाठी सरकारकडे पैसा नाही, ’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.





