Pune District: पत्रकारांना 50 टक्के सवलतीत वैद्यकीय उपचार

सोरतापवाडी : पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन महाराज माथेफोड यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, डॉक्टर वेलफेअर असोसिएशन, उरुळी कांचन यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील पत्रकार व त्यांच्या कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.
या निर्णयानुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना – म्हणजे आई-वडील, पत्नी व मुले यांना वैद्यकीय उपचारांमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. हा लाभ पूर्व हवेलीतील अनेक गावातून 150 हून अधिक रुग्णालयांमध्ये मिळणार असून, ही योजना लवकरच अंमलात येणार आहे. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून डॉक्टर वेलफेअर असोसिएशनने हा निर्णय घेतला असून, पत्रकारांच्या सेवेला दिलेल्या मान्यतेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. प्रा. माथेफोड यांच्या पुढाकाराने हे काम शक्य झाले आहे. या निर्णयामुळे अनेक पत्रकार कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश आखाडे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत शितोळे, डॉ. उमा कथले, डॉ. शरद गोते, डॉ. परिमल परदेशी, डॉ. समीर ननावरे, डॉ. विजय फडतरे, डॉ. सुनील गांगुर्डे यांच्या हस्ते सवलतीचे पत्र उपस्थित पत्रकार राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे, राज्य उपाध्यक्ष नितीन करडे, भाऊसाहेब महाडिक, सहदेव खंडागळे, सुनील तुपे, चंद्रकांत दुंडे यांना देण्यात आले.





