Pune District : माऊलींचा पालखी मार्ग खडतरच

पुरंदर तालुक्यात अनेक कामे अपूर्ण ; उड्डाणपूल रखडले, सेवारस्तेही ओबडधोबड
वाल्हे – आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे गुरूवार (दि. 19) जूनला प्रस्थान झाले आहे. दिवे घाट ते नीरा या 50 किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरीकरण काम अद्यापपर्यंतही सुरु असून, यातील झेंडेवाडी ते जेजुरी या मार्गावरील जवळपास सर्व उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली आहेत; मात्र मागील अनेक वर्षांपासून अरूंद पालखी महामार्ग म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरी ते पिसुर्टी फाटा (ता. पुरंदर) या पालखी मार्गावरील उड्डाणपुलांचे कामे तसेच दौंडज व वाल्हे येथील पालखी मार्गाची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून रविवार (दि. 22) ते गुरूवार (दि. 26) या पाच दिवसांत मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळा पुरंदर तालुक्याच्या वेशीवर येऊन ठेपला असताना, पालखी मार्गावरील अपूर्ण राहिले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न, संबंधित विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
पालखी महामार्गातील जुन्या जेजुरी येथील उड्डाणपूल तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतिमधील उड्डाणपूल यांची कामे अद्यापपर्यंत पूर्ण झाली नसल्याने व सेवा रस्ताही अरूंद व ओबडधोबड अवस्थेत असल्याने, तसेच जुन्या जेजुरी येथील उड्डाणपुलाचा सेवा रस्ता पावसाच्या पाण्याने, जलमय होत असल्याने, जेजुरी ते भोरवाडी फाटा या अंतरापर्यंत वैष्णवांची वाट थोडी बिकट होणार आहे.
दौंडज खिंड ते दौंडज हद्दीतील कदम वस्ती पर्यंत पालखी मार्गाचे काम गतीने व उत्तम झाले असून, कदम वस्तीच्या पुढे ते दौंडज उड्डाणपूल येथील रत्याचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत होते; मात्र सद्यःस्थितीत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे.
दौंडज ते वाल्हे येथील वागदरवाडी फाटा येथील मार्गाचे काम झाले असून, महर्षि वाल्मिकी विद्यालय ते वाल्हे बसस्थानक येथील उड्डाणपुलाचे काम अद्यापपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे. पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी येण्या आधीपर्यंत येथील बहुतांश मार्ग पूर्ण करण्याचा माणस संबंधित विभागाकडून करण्यात आला आहे.
माळवाडी ते सुकलवाडी फाटा येथील काम पूर्ण अवस्थेत असून, कामठवाडी येथील उड्डाणपूल व एका बाजूचा सेवा रस्ता अपूर्ण आहे. यामुळे पिसुर्टी फाट्यापर्यंत एकरी वाहतूक सुरू असल्याने, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, पालखी सोहळ्यापूर्वी प्रलंबित राहिलेली सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
पिसुर्टीफाटा येथून, बाह्यवळण असलेला पालखी मार्ग अद्यापपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे. या बाह्यवळण मार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण अवस्थेत आहे; मात्र या मार्गावरील रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळचे काम अद्यापपर्यंत रखडले असल्यामुळे या मार्गावरून वाहतूक होणार नसल्याने, यावर्षीही वाल्हे ते नीरा- लोणंद या जुन्याच व अरूंद पालखी महामार्गावरून वाहने तसेच वैष्णवांची गर्दी होणार असल्यामुळे यावर्षीही वैष्णवांची वाट बिकटच असणार आहे.
पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गाची जवळपास सर्व कामे पूर्ण होत असून, जुनी जेजुरी, जेजुरी औद्योगिक वसाहतिमधील उड्डाणपूल, तसेच दौंडज येथील राहिलेला थोडा मार्ग, वाल्हे येथील राखडलेला थोडा मार्ग तसेच उड्डाणपूल, व कामठवाडी येथील उड्डाणपूल पुढील दोन-तीन दिवसांत राहिलेली कामे पूर्णत्वास जातील. या मार्गावर यावर्षी वारीसाठी कोणताही अडथळा राहणार नाही.
-राजेंद्र ढगे, प्रकल्प अधिकारी.





