Pune District : वाल्ह्यात माऊली, माऊलीचा गजर

समाजआरतीस जमला वैष्णवांचा मेळा
समीर भुजबळ
वाल्हे –
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती।
रखुमाईच्या पती सोयरीया॥
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम।
देई मज प्रेम सर्वकाळ॥
विठू माऊलीऐ हाच वर देयी, संचरोणी राहि हृदया माझी।
तुक म्हणे काही न मागे आणेक, तुक पाई सुख सर्व आहे॥
असे अंभग गात, कपाळी बुक्का, गंध, खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींच्या वाल्हेनगरीत (ता. पुरंदर) माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी (दि. 25) विसावला.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या,खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन,सकाळी सहाच्या सुमारास टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला. सह्याद्रीच्या पहुडलेल्या वाटांनी प्रवास करताना,भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत, सकाळची न्याहरी सह्याद्रीच्या पर्वत रागांच्या कुशीमधील दौंडज खिंडीमध्ये घेऊन क्षणभर विश्रांती घेत वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला. दरम्यान,सकाळी, 11. 15 सुमारास पालखीचा नगारखाना,व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे नगरी दाखल झाला. यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवष्टी करीत माऊली माऊलीचा जयघोष करीत जोरदार स्वागत केले. यानंतर वाल्हेकर ग्रामस्थ व पंचक्रोशीचे स्वागत घेऊन पालखी सोहळा मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.
दरम्यान, अंभग गात वैष्णव वारीची वाट चालत होते. स्वागतानंतर,पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे एक तासांच्या आतमध्ये सुकलवाडी फाट्याजवळील पालखीतळावर पोहचला.दरम्यान,पालखी रथामधून काढून,ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली. यावेळी, ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन, नाचवत पालखी विसाव्याला प्रदक्षिणा घातली. चोपदारांनी सूचना केल्यानंतर वैष्णवांच्या उपस्थितीत समाज आरती झाली. आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावुन माऊलींचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ,पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ दखने, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप,पुरुषोत्तम दादा पाटील,कबीर महाराज, अॅड. रोहीणी पवार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह पुरंदर प्रशासन व वाल्हे प्रशासन अधिकारीवर्ग उपस्थित होते. यावेळी,उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे,तहसीलदार विक्रम रजपुत,उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बरडे,गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ,जेजुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे,आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम काळे,मंडल अधिकारी भारत भिसे,ग्रामविकास अधिकारी जयेंद्र सुळ आदींसह पुरंदर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.
आज नीरा स्नान तर मुक्काम लोणंमध्ये
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरूवार (दि.26) सकाळी साडे सहा वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ होणार असून संध्याकळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.





