रांजणगाव गणपती – श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. अथर्वशीर्ष पठन करण्यासाठी श्री मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांसाठी जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्था केल्याचे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी सांगितले. दुपारी १२ वाजता देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर व गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली होती. श्री महागणपती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्ष स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष श्री. संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे व देवस्थान कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते. जणगाव एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.