पुणे जिल्हा : वीसगाव खोऱ्यात अवकाळीने आंबा उत्पादक अडचणीत

– चालू हंगामात ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले
वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते.त्याचबरोबर आंब्याचे उत्पादन घेतले जाते.हवामानात सतत होणार बदल यात आठ ते दहा दिवस पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन,अंगाची लाही लाही करणारा उखाडा,पाच ते सहाच्या सुमारास तासभर वादळी वारा,विजांच्या कडकडाट सह मुसळदार पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चालू हंगामात आंब्याचे ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले आहे.
आंबा उत्पादन त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग चांगलाच संकटात सापडला आहे. साधारणत: जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. यंदा मोहर येण्यास सुरुवात झाली. त्याच काळात धुके आणि ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणात मोहर झडून गेला. वातावरणातील बदलामुळे तसेच अवेळी पावसामुळे यंदा टप्प्याटप्याने मोहोर येत होता. परंतु वातावरणात तसेच हवामानात वेगाने होणारा बदल, पर्जन्य वृष्टी, कडक उन्हाळा, अचानक पडणारे धुके यामुळे आलेला मोहोर झडून गेला आहे.
यातून वाचलेल्या मोहराचे रुपांतर आंब्याच्या फळात होवून आंबा पक्व होण्यास सुरुवात झाल्यावर उष्णतेच्या लाटेने आणि आता पक्व होऊन काढणीला सुरुवात झाल्यावर वादळी पाऊस आणि गारपिटीने आंब्याचे खूप नुकसान झाले आहे. गेले दहा दिवस अवकाळी पाऊस, गारपिट, विजांच्या कडकडाट, वादळ यामुळे या वर्षी आंब्याचे केवळ २५ ते ३० टक्केच उत्पादन मिळेल. हापूस, केसर आंब्याला दर्जानुसार प्रति डझन ३५० ते ६५० रुपये आणि गावरान आंबे प्रती डझन प्रतवारीनुसार २०० ते २५० प्रतिडझन दर मिळत आहे. आंबा पिकल्यावर रसाळ, मधूर अशी असणारी आंब्यांची चव आंबट,फिकट अशी उन्हाच्या तडाख्याने लागत आहे. झाडावरच आंबा उन्हाच्या झळांमुळे करपू लागला आहे.
इतर फळांचेही नुकसान
तसेच वादळी वाऱ्याने व गारांमुळे आंबा, फणस,शेवगा,काळी मैना (करवंदे), जांभळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिकूल हवामान, वादळी वारा व गारांच्या माऱ्याने डोंगरची काळी मैना (करवंदे), जांभळे यांना आलेली फुले झडून गेल्याने काळी मैना, जांभळे हा रानमेवा तसेच आंबा,फणस ही फळे जेथे गारांचा मार बसला आहे, तेथे काळी पडतात. त्याचा परीणाम या फळांची मागणीवर होतो आहे.
गेल्या ४० वर्षांपासून २० गुंठ्यांत हापूस, केसर, पायरी आंब्यांची बाग लावलेली आहे. गतवर्षी अवकाळी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले होते. यंदाचा हंगाम चांगला जाण्याची अपेक्षा होती. परंतु आंब्याच्या हंगामाची सुरुवात झाल्यावर महाशिवरात्रीच्या दरम्यान धुके, ढगाळ हवामानामुळे मोहर मोठ्या प्रमाणात झडला. त्यानंतर हवामानात होणारा बदलामुळे दुबार मोहर आला. परंतु गेले अनेक दिवस अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यामुळे आंब्यांचे फळ झडून गेली. तसेच उरलेल्या फळांवर डाग पडले. त्यामुळे आंबा उत्पादक अडचणीत आला आहे.
– बनूबाई दगडू वरे, आंबा उत्पादक, शेरताठी,वरवडी खुर्द (ता. भोर)





