चिंबळी : खेड तालुक्याच्या दक्षिण भागात मकरसंक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली.
मकर संक्रांतीनिमित्त चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू-धानोरे, मरकळ परिसरात सोमवार (दि. 13) पासून बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत होती. तिळगूळ, वाण, हळदी-कुंकू, पानाचे विडे, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. मंगळवारी (दि. 14) वसे आणि हळदीकुंकू हे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतल्याचे दिसून येत होते.
हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांना तीळगूळ देत महिलांनी मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली. पद्मावती, श्री कालभैरव, महादेव, मारुती, सावता महाराज मंदिरात सुवासिनींनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या ओट्या भरून तिळगूळ वड्यांनी एकमेकींचे तोंड गोड केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या .तिळगूळ घ्या, गोड बोलाअशा आशयाचे मेसेज दिवसरभर सोशल मीडियावर पहायला मिळत होते.