Pune District : अवसरीत शासकीय इतमामात मेजर शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार

अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील मेजर सुनील सोनबापू शिंदे (वय ३९) यांचे पुणे येथे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये आजाराने शनिवारी, दि.७ रोजी निधन झाले. त्यांच्यावर अवसरी खुर्द येथील वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात रविवार, दि. ८ रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह लष्करातील अधिकारी उपस्थित होते.
मेजर सुनील शिंदे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, आई, वडील, पत्नी, असा परिवार आहे. सन२००६ मध्ये त्यांची लष्करात भरती झाली. हिमाचल प्रदेश ,जम्मू काश्मीर, बिहार या परिसरात त्यांनी देशाची सेवा केली आहे. त्यांना मेजर म्हणून बढती त्यांना मिळाली होती. ते आजारी पडल्यामुळे पुण्याच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अवसरी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहाची फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अवसरी खुर्द ग्रामपंचायत व लष्कराच्या वतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
यावेळी लष्करातील अधिकारी व आंबेगाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मीबाई शिंदे या त्यांच्या आई ,सोनबापू शिंदे हे त्यांचे वडील, सारिका शिंदे या त्यांच्या पत्नी, आयुशा व कृतिका या त्यांच्या कन्या व विजय शिंदे व अजय शिंदे हे त्यांचे बंधू होत.





