मंचर – आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार, दि. २४ रोजी घोडेगाव तहसील कार्यालय येथे भरला जाणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीमधील सर्व घटक उपस्थित मंचर येथील मार्केटयार्ड कमिटीमध्ये नऊ वाजता होणाऱ्या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंचर येथे महायुतीमधील घटक पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे बोलत होते. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, भाजपचे वरिष्ठ नेते डॉ.ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, संदीप बाणखेले उपस्थित होते. यावेळी विष्णूकाका हिंगे म्हणाले, महायुतीमध्ये शिंदे गट, भाजपा, आरपीआय हे पक्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे. आंबेगाव-शिरूर मतदार संघात उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी शाश्वत विकास कामे केली आहेत. प्रत्येक खेडोपाडी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. जिल्हा परिषद शाळेमधील इमारती तसेच आरोग्य सुविधा निर्माण केले आहेत. तालुक्यातील जनतेचे विकास कामामुळे राहणीमान तसेच आर्थिक सर्व उंचावला आहे. पाणीपुरवठा योजना, वीज केंद्र, शेतमाल प्रक्रिया उद्योग या उभारणीस चालला दिले आहे. शरद सहकारी बँक, मंचर उपजिल्हा रुग्णालय ,भीमाशंकर सहकारी कारखाना तसेच शिरूर आंबेगाव मतदारसंघांमध्ये दळणवळण व्यवस्था ,शिक्षण व्यवस्था सर्वांगीण विकास दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झाला आहे. यावेळी भाजपचे नेते जयसिंग एरंडे,ताराचंद कराळे म्हणाले की, भाजपाने प्रत्येक मतदारसंघात समन्वयक पाठवला असून त्यांच्या माध्यमातून भाजपाने गावोगावी बैठका सुरू केले आहेत. महायुतीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून भाजपचे कामकाज सुरू आहे.यावेळी विष्णू काका हिंगे म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांदा,दुधाचे भाव तसेच आदिवासी भागांमध्ये संविधान बदल हे विषय विरोधी पक्षाने वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे तालुक्यात शिवाजीराव पाटील यांना मतदान कमी झाले आहे. परंतु लोकसभेचे मुद्दे आणि विधानसभेचे मुद्दे हे वेगळे असतात. लोकसभा आणि विधानसभेला जनतेचा वेगळा विचार करते.