पुणे जिल्हा : महाविकास आघाडी एकत्रच लढणार- संजय राऊत

राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करेल
मंचर – राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व निवडणुका एकत्रित लढविण्यावर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामाची नोंद इतिहासात झाली आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागे शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. त्यामुळे भविष्यात आढळराव-पाटील संसदेत असतील; हे मात्र नक्की, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
लांडेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. राऊत म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यातील सरकार टिकणार नाही असे सांगत हे सरकार पडावे यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते. सरकार जाण्यासाठी विरोधक तारखांवर तारखा देत होते. आता शेवटची तारीख 1 जून दिली आहे; मात्र महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
मी क्रिकेटची मॅच पाहत नाही, अगदी टीव्हीवर सुद्धा कधी मॅच पाहिली नाही; मात्र बॅटिंग, बॉलिंग सगळे करतो. असे सांगून ते म्हणाले आढळराव पाटील यांनी आमंत्रण दिल्यावरून येथे आलो आहे. बॉलिंग, बॅटिंग, पंचगिरी, वाइड बॉल सर्व काही करण्याची तयारी आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुरुवातीला स्वागत केले. यावेळी संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, देविदास दरेकर, सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, अशोक बाजारे, रामशेठ तोडकर, संतोष डोके, रवींद्र वळसे-पाटील पदाधिकारी उपस्थित होते.
तपास यंत्रणांचा गैरवापर
आमच्यावर सूड भावनेने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. महाराष्ट्रावर वैर आहे, या भावनेतून कारवाई केली जाते. सुडापोटी ही कारवाई होत असून महाराष्ट्राला केंद्राकडून सहकार्य मिळत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता भाजपला नको आहे. महाविकास आघाडीवर संकटावर संकट येत असतानाही ती ताकदीने उभी आहे. राज्यात आघाडीत बिघाडी झाल्याचा आरोप काहीजण करतात; मात्र युतीच्या काळातही अशीच परिस्थिती होती. दोन तीन पक्षांचे सरकार ज्यावेळी सत्तेत असते, त्यावेळी असे प्रकार घडत असतात; मात्र एकत्र बसून निर्णय घ्यायचे असतात, त्यातून मार्ग निघतो.
शिवसेनेला अयोध्या नवीन नाही
आमदार रोहित पवार हे अयोध्या दौऱ्यावर आहेत, ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व आम्ही सगळे अयोध्येला जाणार असून तेथे आत्ताच स्वागताचे फलक लागले आहेत. अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. तिथे प्रत्येकाने जायला पाहिजे. शिवसेनेला अयोध्या नवीन नाही. राज ठाकरे हेसुद्धा अयोध्याला जाणार आहेत असे विचारले असता ठाकरे यांनी आतापर्यंत कोणता मुद्दा उचलला तो संशोधनाचा विषय आहे. असे राऊत यांनी स्पष्ट केले.
ही तर लोकशाहीतील दुर्घटना
निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे ही देशाची मागणी आहे. 12 आमदारांची यादी राज्यपालांकडून अद्याप मंजूर झालेली नाही. या विषयी बोलताना ते म्हणाले ही लोकशाहीतील घटना नसून दुर्घटना आहे.
शिवसेनेला फरक पडणार नाही
भाजपा व मनसे युती झाल्यास परिणाम होईल का, असे विचारले असता कसला परिणाम त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असा टोला त्यांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला कोणाचेही आव्हान नाही. ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी झिडकारले आहे. आम्ही पुणे महानगरपालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे.





