पुणे जिल्हा : महाळुंगे इंगळेत पाण्यासाठी वणवण

चाकण एमआयडीसीतील महत्त्वाचे गाव पण टंचाईने ग्रासलेले
राजेंद्र सुरसे
महाळुंगे इंगळे – चाकण एमआयडीसीमधील महाळुंगे इंगळे हे महत्त्वाचे गाव आहे; मात्र याच गावात सध्या पाण्याची भीषणटंचाई जाणवत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
मागील वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. मानवाप्रमाणे प्राणी, पक्षी यांना देखील दुष्काळाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, सर्वत्र पाणीटंचाई भासत आहे.
श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथे मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असल्याने दरवर्षी पाण्याची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होते. यावर्षी देखील पाणीपातळी खालावल्याने गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने गाव मोठे पण लक्षण खोटे आहे की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मुबलक पाणीसाठा व्हावा या दृष्टिकोनातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे त्यासाठी निविदा देखील देण्यात आलेली आहे.पाण्याचे योग्य नियोज करून महाळुंगे इंगळे येथील रहिवाशांना पाण्याची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही सरपंच अर्चना महाळुंगकर यांनी दिली.





