पुणे जिल्हा : झेडपी, पंचायत समितीसाठी इच्छुकांची लगबग

सोरतापवाडी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडे भावी उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घोषित होण्याच्या आशेवर भावी उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असून, पूर्व हवेलीतील अनेक गावांत आपणच भावी उमेदवार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची लगबग वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला असून आत्तापासूनच अनेक कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे कार्यकर्ते बॅकफुटला गेले असून महाविकास आघाडीमध्ये पूर्व हवेलीत शांतता पसरली आहे.
शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माऊली कटके यांनी मिळविलेल्या घवघवीत यशामुळे युतीच्या भावी उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असून त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भावी उमेदवार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाला भेटी देत असुन विविध कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. मतदारांना आपणच भावी उमेदवार असल्याचे स्वतःहून सांगत आहेत.
अनेक महिने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विविध कारणांनी लांबल्याने भावी उमेदवारांमध्ये निरुत्साही होता; परंतु विधानसभा निवडणुका होताच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भावी उमेदवारांचा उत्साह वाढला आहे. सर्व पक्षातील भावी उमेदवार सावधपणे व्यूहरचना करताना दिसत आहेत.
सर्व पक्षातील इच्छुकांची संख्या जास्त असून कुणाला उमेदवारी मिळते याकडे भावी उमेदवार सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसेच उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीला उधाण येणार का, याकडे आगामी निवडणुकीचे भवितव्य असणार आहे. पूर्व हवेलीत राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी देऊन इतरांना शांत करणे पक्षाला जिकिरीचे होणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (दोन्ही गट), भाजप व काँग्रेस पक्षात उमेदवारी मागणारे पण जास्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भावी उमेदवार दबक्या पावलांनी प्रचार करत असून विविध कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.
आयाराम-गयारामांची संख्या वाढणार
सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नागरिक सांगत असून धावत्या लगबगीमध्ये पक्षासह गावपुढार्यांचा पण कस लागणार आहे. एका पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर दुसर्या पक्षातून निवडणूक लढण्याच्या तयारीत काही इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे सर्व पक्षातील उमेदवारांना शांत करणे मोठे आव्हान असणार आहे. पूर्व हवेलीत कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचनपर्यंत अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी तयार असून उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांची पळापळी आत्तापासूनच चालू झाली आहे. त्यामुळे निवडणूका कधी घोषित होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





