लोणी काळभोर : दौंड शहराला पुण्याचे उपनगर म्हणून मान्यता देऊन पुणे-लोणावळा प्रमाणे पुणे – दौंड लोकल सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सकाळी सहाची दौंड-पुणे डेमू गाडी हडपसरमध्ये थांबवण्याऐवजी पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत नेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. पुणे-दौंड लोहमार्गाचे 2016 मध्ये म्हणजे आठ वर्षांपूर्वी विद्युतीकरण पूर्ण होऊनही, स्थानिक सुविधा आणि सेवांमध्ये अद्यापही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. या सुधारणा तत्काळ करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून पुणे-दौंड मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे की पुणे लोणावळा मार्गावर ज्या कार्यक्षमतेने रेल्वे प्रशासन सेवा देते तशाच सेवा पुणे दौंड मार्गावरही सुरु कराव्यात. पुणे ते दौंड दरम्यानचा रेल्वे मार्ग 130 किलोमीटर प्रती तास या वेगाने रेल्वे गाड्या चालतील या पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. तरीही डेमू गाड्या सततच्या तांत्रिक अडचणींमुळे फक्त 70 किलोमीटर प्रती तास वेगाने चालते. त्यामुळे 74 किमी अंतर कापण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने हा विलंब वाढतो, त्यामुळे स्थानिक प्रवाशांकडे व स्थानिक रेल्वे सेवेकडे दुर्लक्ष होते. गेल्या आठ वर्षांत, राज्याबाहेरील प्रवासासाठी अनेक नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र कोविड 19 (करोना महामारी) साथीच्या आजारा दरम्यान स्थगित करण्यात आलेल्या लोकल गाड्या अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. दौंडहून सकाळी 6 वाजता पुण्याकडे जाणारी डेमू ट्रेन सध्या पुण्यापासून अलिकडे पाच किलोमीटर अंतरावर हडपसर येथे थांबते. यामुळे अनेक कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना हडपसर येथे उतरण्यास भाग पाडले जाते, परिणामी कामावर, शाळा – महाविद्यालयात जायला विलंब होतो आणि प्रवास खर्च वाढतो. साधारणत: फक्त 8- 10 डब्यांचा समावेश असलेल्या या ट्रेनमध्ये महिला, प्रथम श्रेणी, अपंग आणि गरोदर प्रवाशांसाठी डब्यांचा अभाव आहे. त्यामुळे गाडीत प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना अनेकदा उभे राहून लांबचा प्रवास करावा लागतो आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी मार्ग काढण्यासाठी डेमु गाड्या वारंवार बाजूला काढल्या जातात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो. केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि खासदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देऊनही, प्रवाशांना केवळ आश्वासने मिळतात; पण त्यात कोणतीही भरीव सुधारणा झालेली नाही. 12 ते 16 डब्यांची लोकल हवी लोकल विजेवर धावणार असल्याने डीझेलची आवश्यकता नाही. 12 किंवा 16 डब्यांच्या लोकलमुळे जास्त प्रवाशांची वाहतूक होईल. डेमूच्या तुलनेत लोकलच्या डब्यांची रुंदी जास्त असल्याने प्रवासी जास्त संख्येने सामावण्याची क्षमता असते. एका डब्यात 110 आसन क्षमता, तसेच उभे राहून 300 प्रवासी प्रवास करू शकतात. ताशी 110 किमी वेगामुळे जलद प्रवास, पर्यायाने प्रवाशांचा वेळ वाचतो. या लोकलमुळे दौंड, पाटस, केडगांव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मुंढवा आणि हडपसर परिसरातील रेल्वे प्रवाशांना आता थेट लोकलने लोणावळ्या पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. पॅसेंजर गाड्यांवरील भार कमी होणार लोकल सुरु झाल्यानंतर पुण्याहून दौंडकडे सुटणार्या पॅसेंजर गाड्यांवरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे. त्याशिवाय पुणे रेल्वे स्थानकावर येणार्या प्रवाशांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. दौंड- पुणे विद्युतीकरणामुळे दौंड ते मुंबई पर्यंतचा भाग विद्युतीकरणाने जोडला गेला आहे. या लोकलमुळे दौंड ते लोणावळ्यापर्यंतचा प्रवास सहजच करता येणार आहे. या मार्गावर दौंड- पुणे- लोणावळा या लोकल पुढील काळात धावणार आहेत. मात्र, या लोकल अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास परिसरातील प्रवाशांना मुंबईचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांच्या मागण्या * लोकल ट्रेनच्या सुधारणांना प्राधान्य द्या * सेवा सुरळीत करण्यासाठी दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करा * सकाळी 6 ची डेमु गाडी हडपसर ऐवजी पुणे स्टेशनवर न्या * कोविड- 19 महामारी दरम्यान बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा * दौंड ते पुणे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 दरम्यान दोन नवीन गाड्या सुरू करा