वाल्हे – वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. अतिअल्प पावसानंतर आता ढगाळ हवामान झाल्याने फळबागांसह, कांदा, तूर, ज्वारी आदी पिकांवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. यावर्षी, कांदा हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला आहे. ढगाळ हवामानामुळे तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या कष्टाने जगवलेले व हातातोडांशी आलेले कांद्याचे पीक खराब होऊन कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. यातच शेतातील पिके कमी पाण्यात घेण्यासाठी धडपडत आहेत. यातच वातावरणातील बदलाने शेतातील पिकांवर किडीच प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत. वातावरणातील बदलाचा फटका कांदा उत्पादकांना फटका बसत असतानाच दर आठवड्याला कांद्याच्या दरात चढउतार होत आहेत. दरम्यान, पावसाळ्यानंतर कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने, व अतिअल्प पाण्यावर उत्पादन आणलेले व महागडे बियाणे खरेदी करुन नवीन लागवडला केलेला कांदा तरी चार पैसे मिळवून देईल या आशेवर कांदा उत्पादक शेतकरी आहेत. या कारणांमुळे प्रचंड नुकसान कांदा पीक हे नाशवंत असले तरी रोजच्या आहारामध्ये गरज असणारे पीक आहे. चालु हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा रोपाला बुरशी होणे, लागवडीनंतर रोप न फुटणे, लागवड केलेला कांदा न उगवणे किंवा जळणे, खराब हवामानामुळे कांद्याच्या माना लांबणे, (बगळा होणे) पावसामुळे कांदा खराब होणे, निकृष्ट दर्जाचे कांदा बियाणे आदी वेगवेगळ्या कारणाने प्रचंड नुकसान शेतकरीवर्गाचे होत आहे.