पुणे जिल्हा : कोरेगाव भीमामध्ये बिबट्याची दहशत

वनविभागाने पिंजरा बसवावा : सरपंच ढेरंगेंची मागणी
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढयावर पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील बोकडाला शुक्रवारी सायंकाळी बिबट्याने झडप घालत शिकार केल्याची घटना घडली. लोकवस्तीमध्ये झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने कोरेगाव भीमा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ ढेरंगे यांचा गायीचा गोठा असून शेती कामासाठी असलेल्या एका कुटुंबाच्या देशी बोकडावर बिबट्याने हल्ला केल्याने पसरलेल्या भीतीच्या वातारवरणामुळे कोरेगाव भिमामध्ये त्वरित पिंजरा बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनेची माहिती हेमंत ढेरंगे यांनी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना दिली असता ढेरंगे यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क केल्याने नियत क्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.
यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, स्थानिक शेतकरी हेमंत ढेरंगे, पद्माकर ढेरंगे, चंद्रकला चाफेकानडे, नियत क्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बिबट्याने हल्ला केल्याची घटना समजताच त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्ला केलेल्या बोकड मिळून आला नाही. पुढील कार्यवाहीसाठी घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली असून त्वरित पिंजरा बसविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– बबन दहातोंडे, नियत क्षेत्र अधिकारी.





