Pune District : खेड तहसील कार्यालयावर वकील धडकले

राजगुरूनगर : खेडचे निवासी नायब तहसीलदार यांनी केलेले बेजबाबदार वक्तव्य आणि गैरवर्तणुकीच्या विरोधात खेड वकील बार असोशिएशनच्या वतीने प्रांत अधिकारी, खेड तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी (दि.30) निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.
वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अॅड. विलास काळे आणि निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांच्यात चार दिवसांपूर्वी हमरीतुमरी झाली होती. पोलिसांना बोलावण्यात आले होते. दोन्ही बाजूकडून पोलिसांत जाण्यापर्यंत वाद झाला होता. या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाली. यापूर्वीही खेडचे प्रांत कट्यारे, तहसीलदार बेडसे यांच्या कामकाजाच्या विरोधात वकिलांमध्ये नाराजी होती. त्यावेळीही निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यात आणि वकिलांसोबत वादावादी झाली होती. आताही वकील आणि निवासी नायब तहसीलदार यांच्यात संघर्ष झाला आहे. वकील आणि निवासी नायब तहसीलदार यांच्यात झालेल्या वादावादीनंतर वकील संघटना आक्रमक झाली. खेडचे निवासी नायब तहसीलदार यांनी केलेले बेजबाबदार वक्तव्य आणि गैरवर्तणूकीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, खेड तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी निषेध मोर्चा काढत महसुली न्यायालयामध्ये गुरुवारी (दि. 30) व शुक्रवारी (दि. 31) असा दोन दिवस कामकाजावर वकिलांनी बहिष्कार टाकला आहे.
निवासी नायब तहसीलदारांचे तात्काळ निलबंन करावे निलंबन कारवाई न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मनीषा खैरे यांनी निवेदन स्वीकारले. या निषेध आंदोलनात खेड बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते.
नायब तहसीलदार यांनी वकिलांबाबत गैरवर्तन केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यापूर्वीही वकिलांसोबत यापूर्वीचे तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी वाद घातले होते. वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. पक्षकार आणि वकिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. गैरवर्तन करणार्या अशा अधिकार्यांचे निलंबन करावे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
– अॅड. रोहिदास टाकळकर, अध्यक्ष, खेड बार असोसिएशन
खेड तहसीलदार यांच्या पुढे तारखा होत्या. आम्ही हजर होतो; मात्र त्या दिवशी त्या झाल्या नाहीत. त्या दिवशी तहसीलदार नव्हते. पक्षकार बसून ठेवले होते म्हणून निवासी नायब तहसीलदार जोगदंड यांनी तहसीलदार नाहीत तारखा होणार नाहीत हे सांगायला पाहिजे होते. हे न सांगताना पक्षकारांना बसवून ठेवले. त्याबाबत जाब विचारला असता त्यांनी अरेरावी केली. शूटिंग करून घेत होते. मी वकील असताना माझ्याशी गैरवर्तन केले.
– अॅड. विलास काळे, ज्येष्ठ विधिज्ञ
काही दिवसांपूवी वकीलपत्र दाखल करताना तहसीलदारांनी नकार दिला. त्यावेळी तीन तास हुज्जत घातली होती. पोलीस बोलावले होते. वकील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे. मात्र अधिकारी पोलिसांना पाचारण करून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिकार्यांचा मस्तवालपणा, मनमानी, अरेरावी कदापि सहन करणार नाही. भ्रष्ट अधिकार्यांचा मुजोरपणा वाढला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
-अॅड. पुष्कराज परदेशी, ज्येष्ठ विधिज्ञ





