लोणी काळभोर : विकासाला आमचा विरोध नाही; मात्र जेवढी जमीन शासन वेगवेगळ्या विकास कामांसाठी घेईल त्या जमिनीचा मोबदला रेडी रेकनरच्या पाच पट मिळाला पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेत कदमवाकवस्ती येथील शेतकर्यांनी प्रशासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. प्रारुप विकास योजनेतील 65 मीटर रुंद रस्त्यासाठी सन 2015 च्या नवीन भूसंपादन अधिनियमाद्वारे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करायच्या जमिनीच्या भूसंपादन प्रस्तावासंदर्भात कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात प्रशासन व स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक पार पडली. यावेळी शेतकर्यांनी वरील भूमिका घेतली. यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून विद्या गायकवाड, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आदी अधिकारी उपस्थित होते. हा रिंग रोड हा 65 मीटरचा असून भावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेतकर्यांची अंदाजे 17 एकर जमीन (67581. 54 चौरस मीटर) या रस्त्यामध्ये जाणार आहे. प्रशासनाला जमीन खरेदी करून क्षेत्र विकत घ्यायचे आहे. यावेळी शेतकर्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकार्यांना सांगितल्या. तसेच काही शेतकर्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले आहे. मात्र त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यांना मोबदला मिळणार का ? यावेळी पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकार्यांनी सूचनांची नोंद करून घेतली. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, उद्योजक बाळासाहेब भोसले, गणपत चावट, चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, सदस्य आकाश काळभोर, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, उदय काळभोर, सुशील काळभोर, तुषार काळभोर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकर्यांचे क्षेत्र जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी लोकहित व विकासासाठी क्षेत्र देऊन सहकार्य करावे. तसेच या क्षेत्राच्या बदल्यात शेतकर्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला देण्यात येणार आहे. -कल्याण पांढरे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी क्षेत्र देण्यासाठी आमची काहीही अडचण नाही. पण रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला आम्हाला मान्य नाही. जर शासनाने रेडी रेकनरच्या 5 पट मोबदला दिला, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ, अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत. -गणपत चावट, शेतकरी