Pune District : लाखणगाव-मंचर बस सहा महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल

पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव ते मंचर एसटी बस गेल्या पाच ते सहा महिण्यापासून बंद असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे गैरसोय होत असून एसटी महामंडळाने लवकर एसटी बस सुरू करावी, अशी मागणी पूर्व भागातील लाखणगाव, देवगाव, काठापूर येथील नागरिकांनी केली आहे.
लाखणगाव मंचर देवगाव पारगाव मार्गे एसटी बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करून व मिळेल त्या खाजगी वाहनाने पारगाव व मंचर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी यावे लागत आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना कामानिमित्त मंचर, पारगाव,घोडेगाव प्रवास करावा लागत आहे. एसटी बस नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच आजारी गरिब रुग्णांना खाजगी व सरकारी दवाखान्यात वेळेत पोहचता येत नाही.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बि.बियाणे खते औषधे खरेदी करण्यासाठी व बँकेत कामानिमित्त पारगाव बाजारपेठ यावे लागत आहे.
लाखणगाव ते पारगाव रस्त्याचे काम सुरू होते, हे कारण सांगून महामंडळाने एसटी बसेस बंद केल्या होत्या. पाच ते सहा महिण्यापासून लाखणगाव मंचर मुक्कामी एस टी बस बंद आहे. तसेच दररोज येणाऱ्या एसटी बसही बंद होती. परंतु आता रस्त्याचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी एसटी बस सुरू करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
लाखणगाव-मंचर मुक्काम एस टी बस लवकरात लवकर सुरू करावी तसेच सकाळ व सायंकाळी येणाऱ्या एसटी बसेस सुरू करण्यात यावी, यासाठी लाखणगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) माजी सरपंच मार्तंड टाव्हरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख माऊली पाटील, अनिल भागवत, मनोज पाटील यांनी एसटी महामंडळ मंचर येथे निवेदन दिले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी धामणी,पहाडदरा, शिरदाळे,तसेच लागणगाव, देवगाव तसेच आदिवासी गावामध्ये एसटी बसेस वेळेवर येत नाहीत तर काही गावांमध्ये तर बसेस जात नाही. यामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना वेळेत पोहचण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे प्रयत्न करावेत अन्यथा शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.





