शिक्षकाची नियुक्ती करा : पहिल्याच दिवशी घटना मांडवगण फराटा – कोळगाव डोळस (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश सोहळ्यादिवशी वेगळाच प्रकार घडला. शाळेत एका रिक्त जागी शिक्षकाची नियुक्ती करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. काही महिन्यापूर्वी शाळेत एका शिक्षकांकडून एका विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली असता त्याचे निलंबन केले. तेव्हापासून एकच शिक्षक चारही वर्गांना शिकवत आहेत. पालकांनी अनेक वेळा एका शिक्षकाची मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने मागणीचा विचारच केला नाही. परिणामी संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले. शिक्षण विभागाचा तीव्र निषेध नोंदवत जोपर्यंत शाळेला दुसरा शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळा उघडून देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी उपसरपंच सिद्धार्थ डोळस, विलास जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, तुकाराम जगताप, माजी सरपंच सोमनाथ सूर्यवंशी, बाबू गोरे, नारायण शेंडगे, प्रकाश वाळुंज, संभाजी कुल, आबासाहेब नागवडे, यशवंत पडवळ, अर्जुन सूर्यवंशी, प्रमोद धामोरे, शंकर कोळपे, उमेश सूर्यवंशी, बाळासाहेब धुमाळ उपस्थित होते. सहा महिन्यांपासून शाळेत चारही वर्गांना एकच शिक्षक शिकवत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वेळोवेळी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही एक शिक्षक देण्यास टाळाटाळ करीत आहेत. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान यास शिक्षण विभागाच जबादार आहेत. कैलास सूर्यवंशी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती. निर्वी केंद्र शाळेतील माने मळा येथील एक शिक्षक कोळगाव डोळस शाळेला देण्यात येणार आहे. ग्रामस्थ व पालक यांच्याशी चर्चा करण्यासाठी विस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांना पाठविले असून लवकरच शाळा सुरु होईल. ग्रामस्थांनी सहकार्य करावे. बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरूर.