महसूल सप्ताहात एकाच दिवशी 4721 लाभार्थ्यांना शासकीय सेवा राजगुरुनगर – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महसूल सप्ताह साजरा होत असताना, खेड तालुक्याने आपल्या कार्यक्षमतेचा व परिणामकारकतेचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. महसूल सप्ताहाअंतर्गत 1 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तालुक्यातील 11 मंडल महसूल विभागांमार्फत तब्बल 4 हजार 721 शेतकरी आणि नागरीकांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. ही माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली व प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बीजे, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार मनिषा खैरे, सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आदींनी संयोजन व अंमलबजावणीची जबाबदारी लीलया पार पाडली. या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाने नागरिकांच्या दारात सेवा हे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवले आहे. पूर्वी तासन्तास तहसील कार्यालयाच्या रांगेत उभे राहून मिळणार्या सेवा आता गावातच एका दिवसात दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तहसीलदार बेडसे यांनी सांगितले की, ही योजना म्हणजे केवळ शासकीय कागदपत्रे वाटप नव्हे, तर लोकसहभागातून सुशासनाचा एक प्रेरणादायी नमुना आहे. यापुढेही महसूल विभाग अशाच पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करेल. लाभार्थ्यांना मिळालेले सेवा-लाभ महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित शिबिरांमध्ये नागरिकांना व शेतकर्यांना तत्काळ सेवा व दाखले देण्यात आले. जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्म व मृत्यू दाखले, ई-केवायसी रेशनकार्ड, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी निवड, शेतकर्यांसाठी 7/12 उतार्यावर वारसनोंदी, मयत नावे कमी करणे, एकत्र कुटुंब प्रमाणपत्र (एकुंम्या), अँग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी या सेवा लाभार्थ्यांना एका दिवसात उपलब्ध करून देण्यात आल्या. मंडलनिहाय कामगिरी या अभियानात कनेरसर मंडल आघाडीवर असून 817 लाभार्थ्यांना सेवा मिळाल्या. त्यानंतर आळंदी मंडल 701, पिंपळगाव तर्फे चाकण 530, कंरजविहिरे 541, वेताळे 504 या मंडळांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली. दुसरीकडे, काही मंडळांनी अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली आहे. विशेषतः कुडे बु. मंडलात केवळ 62 नोंदी, कडूस 129, वाडा 142, पाईट 234, या आकडेवारीने यांचा कार्यगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.राजगुरुनगर (438) आणि चाकण (453) हे शहरी व जास्त लोकसंख्या असलेले मंडळ असूनही त्याठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी नागरिकांपर्यंत सेवा पोहोचल्या, ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने आत्मचिंतनाची आहे.