पुणे जिल्हा : वाल्ह्यात खरीप हातचा गेला

शेतातून पाणी निघत नसल्याने पिके सडली
ऊन मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली : कीड-रोगराईला निमंत्रण
वाल्हे – परतीच्या पावसाने वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात खरीप हंगामात वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तूर, मूग, सोयाबीन, बाजरी, घेवडा, भुईमूग, सूर्यफूलसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील पाणी निघत नसल्याने पिके कुजत आहेत.
खरीपातील पिकांवर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला आहे. शेतातील पाणीच निघत नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. सततच्या पावसामुळे पिके काढणीची कामे खोळंबली आहेत. पिके आणि त्यातील तण एकसारखीच वाढली आहेत.
कडधान्य काढणीस आली आहेत. मात्र पाऊस उघडीप देत नसल्याने कडधान्ये पिके जागेवर कुजण्याच्या मार्गावर आहेत. ऊन मिळत नसल्याने इतर पिकांची वाढ खुंटली आहे. कीड व रोगराईला निमंत्रण मिळत आहे. मागील आठवड्यात दररोज सायंकाळी ढगफुटीसारखा पाऊस कोसळत होता.
पावसामुळे खरीप हंगामातील कोरडवाहू जमिनीतील पिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरीही इतर पिकांचे नुकसान होत असून, बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. बियाण्यांसह खत, रोजंदारीसाठी हजारो रुपये खर्च झालेले पीक हातातून निघून जाते की काय? अशी अवस्था आहे.
हिरव्या चाऱ्याचा प्रश्न
जनावरांचा शेतातील हिरवा चारा वाया गेला असून चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती बळीराजाला सतावू लागली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नव्याने बनवलेला वाल्हे-पिंगोरी रस्ते या पावसात वाहून गेल्याने वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
भाजीपाला वधारला पण…
सद्यःस्थितीत पितृपक्ष सुरू असल्याने बाजारात भाजीपाल्यांला चांगला भाव आहे. तर शेतात मालच नाही. विकायचे काय हा प्रश्न बागायती शेतकऱ्यांना पडला आहे. उसावर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून, तरकारीवर रोग पडले आहेत. त्यामुळे बाजारात चढ्या दराने भाजीपाला मिळत आहे.





