Pune District : मुळशीतील सहा गावांचा समावेश हा ग्रामीण पोलिसांकडेच ठेवा

पिरंगुट –मुळशी तालुक्यातील सहा गावांचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात समावेश न करता ही गावे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे ठेवावी, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार मांडेकर यांनी ही मागणी केली. पुरवणी मागणी प्रश्नांवर चर्चा करताना ते बोलत होते. मुळशी तालुक्यातील पूर्व भागातील सहा गावे पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात समावेश झाला आहे. पूर्व भागातील भूगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे, चांदे आणि नांदे ही गावे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कक्षेतून काढून पिंपरी – चिंचवड कार्यालयात समाविष्ट झाली आहेत. यासाठी बावधन येथील पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर झाले असून, फेब्रुवारी 2025 पासून या गावाचा कारभार देखील बावधन येथून सुरू झाला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुळशीतील 96 गावे, वाड्या वस्त्यांचा कारभार हा पौड पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आजतागायत व्यवस्थित चालू आहे. मुळशी तालुक्यातील गावांच्या दृष्टीने पाषाण येथे असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय सोयीचे आहे. अचानकपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या कार्यालयाशी तात्काळ संपर्क करून वेळीच उपाययोजना करता येईल; मात्र हे कार्यालय पिंपरी चिंचवड येथे केले तर ये- जा करण्यासाठी कालावधी लागणार आहे. परिणामी उद्भवलेली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
या गावातील नागरिकांना पौड पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय अन्य कार्यालये ही पौड येथे असल्याने सोईस्कर आहे; मात्र पोलीस आयुक्तालयात गेल्याने याठिकाणी जाणे येणे अवघड झाले. त्यामुळे ही गावे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे ठेवावी.
-शंकर मांडेकर, आमदार





