राजगुरूनगर : कळमोडी उपसा जलसिंचन योजनेच्या सद्यस्थितीचा अहवाल कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी केलेल्या मागणीनुसार भामा आसखेड धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी. बी. शिंदे यांनी दिला असून, त्यात मूळ प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पीय पाणीवापराच्या मर्यादेत महाराष्ट्रातील पाटंबधारे प्रकल्पावर आठमाही पाणीपुरवठा पद्धती सुरू करण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार कळमोडी प्रकल्पाचे फेरनियोजन करण्याचा प्रस्ताव मंडळ कार्यालयाने प्रदेश कार्यालयास म्हणजेच मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग पुणे यांना सादर केल्याचे अहवालात नमूद केले आहे. कळमोडीची मूळ योजना ही खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील 1625 हेक्टर व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील 3440 हेक्टर असे एकूण 5065 हेक्टर क्षेत्रासाठी प्रस्तावित होती. त्याचा 198 कोटींचा सुप्रमा जलसंपदा विभागाकडे मंत्रालयात मंजुरीसाठीही गेला होता; परंतु वाढीव क्षेत्राचा समावेश करण्यासाठी सुप्रमातही बदल करावा लागला. तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यास विलंब होत आहे. तसेच शासन व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता यामुळे आगामी अर्थसंकल्पात कळमोडी योजनेचा सुप्रमा मंजूर होऊन निधी जाहीर होणे धूसर असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले. आठमाही पीक योजना व प्रकल्पाचे होत असलेले फेर जलनियोजन पाहता लोकप्रतिनिधींनी निर्णायक भूमिका घेऊन शासनाकडे तातडीने सुप्रमा पाठविणे व त्यास मंजुरी मिळविणे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अन्यथा कळमोडी योजना ही मृगजळ ठरेल, असे मत टाव्हरे यांनी व्यक्त केले. अहवालात काय? आठमाही पीकरचना विचारात घेऊन पाण्याची होणारी बचत यातून कळमोडी जलाशयावरील भीमाशंकर उपसा योजना (मौजे एकलहरे, मौजे कुडे) एकूण लाभक्षेत्र 305 हेक्टर व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव या गावांतील 1252 हेक्टर या अतिरिक्त सिंचन क्षेत्राचा समावेश करून तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी पाठविला असता त्यांनी उपस्थित केलेली शेरेपूर्तता कृष्णा खोरे विकास महामंडळाने दि. 13 डिसेंबर 2024 रोजी केल्याचे अहवालात म्हटले आहे.