पुणे जिल्हा : “जुन्नर तालुका विधानसभेची जागा आमच्याकडेच राहणार” ; शरद पवार यांचे स्पष्टीकरण

निवृत्ती नगर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस पक्ष, व मी ज्या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे तो राष्ट्रवादी पक्ष
यांनी एकत्रित येऊन आगामी निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे त्यानुसार जुन्नर ची जागा ही मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे त्या गटाकडे राहील असे स्पष्ट विधान शरद पवार यांनी केले.
रविवार दि १ ऑक्टोबर रोजी जुन्नर या ठिकाणी बिरसा ब्रिगेड आदिवासी राष्ट्रीय परिषदेला जाण्यापूर्वी शरद पवार हे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या घरी थांबले होते त्यावेळी ते पत्रकारांबरोबर बोलत होते. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे तालुक्यातील अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
पुढे बोलताना पवार यांनी,जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या तटस्थपणा बाबतच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,जुन्नर तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी व कार्यकर्त्यांनी आमदार अतुल बेनके यांना कोणत्या रस्त्याने जाणे हिताचे ठरेल याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
त्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेतील असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत उत्तर देताना पवार म्हणाले, “सामान्य माणसाचा विचार महत्त्वाचा असून आज महाराष्ट्रात सगळीकडे आमच्या गटाला लोक प्रतिसाद देत असून मोठ्या संख्येने सभेला जमतात जनतेच्या भावना आमच्या बाजूने अनुकूल आहेत आता काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर लोकशाहीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे त्याबाबत मी बोलू इच्छित नाही.
महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण हे जनतेला माहिती आहे असे सांगतानाच राष्ट्रवादीच्या फुटी नंतर आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या सभेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही सभा लवकरच होईल काळजी नसावी असे सांगितले. तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी कोणाचीही व्यक्तीश: निवड केलेली नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, लवकरच राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचे पॅचअप होणार आहे हे वृत्त खर आहे का? यावर त्यांनी जे लोक भाजपबरोबर गेले ते राष्ट्रवादी असू शकत नाही माघारी यायची भूमिका घेऊन तडजोड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर तो आम्ही स्वीकारणार नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.





