न्हावरे – माळवाडी, तांदळी (ता. शिरूर) येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांदळी परिसरातील माळवाडी या भागांत जिओ कंपनीची सेवा विस्कळीत झाल्याने फोन लागत नाही. तसेच फोन आल्यानंतर किंवा केल्यानंतर आवाज अस्पष्ट येणे, फोन अचानक कट होणे, इंटरनेटला रेंज असूनही सोशल मीडिया व्यवस्थित न चालणे, अशा अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ग्राहकांनी इतर कंपनीचे सिमकार्ड घेतले आहे. लोडशेडिगमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. यावेळी अनेकदा त्यांना बिबट्याचेही दर्शन होत असते. अशा वेळेस त्यांचा इतरांशी संपर्क होत नाही. मोबाइल बँकिंग तसेच इतर इंटरनेट सेवांचा लाभ ही ग्राहक घेऊ शकत नाही. तांदळी या ठिकाणी जिओचा टॉवर असून त्याची फ्रिक्वेंसी वाढवावी किंवा माळवाडी या ठिकाणी जिओचा नवीन टॉवर उभारावा, ग्राहकांची नेटवर्कअभावी होत असलेल्या समस्येवर मार्ग काढून सेवा तात्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे यांनी केली आहे.