Pune District : जात धर्म यातून कटूता घालवणे गरजेचे

सासवड : नव्या पिढीवर चांगले संस्कार कसे देता येतील, सर्व धर्माच्या संबंधी आस्था कशी निर्माण करता येईल, जात धर्म यातून कटूता कशी घालवता येईल ही विचारधारा नव्या पिढीमध्ये रुजवण्याचे मोलाचे काम राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी चळवळीने या देशात, या राज्यात आणि या भागात केले असे म्हणले तर ती अतिशयोक्ती होणार नाही, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथे ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या 81 व्या अभीष्टचिंतन सोहळ्यात पवार बोलत होते. माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख सुभाष वारे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे माजी आमदार जगन्नाथराव शेवाळे, माजी आमदार संभाजी कुंजीर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, सतीश उरसळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे पाटील, अभिजीत जगताप पुष्कर जाधव उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, यश अपयश, जय किंवा पराजय याची कधी चिंता न बाळगणारे अनेक लोक त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यामुळे हा विचार कुठे ना कुठे टिकला आणि त्या विचाराने आजही कामकाज या ठिकाणी सुरू आहे आणि आज त्याची जास्त आवश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये समाजातील सर्व घटकातील लोक इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी एकत्र आले होते. आणि विशेषतः महात्मा गांधींचे नेतृत्व होते ज्यामध्ये अनेक प्रकारचे, अनेक विचारांचे लोक होते. पण स्वातंत्र्य हा एकमेव कार्यक्रम आणि हे सूत्र नजरेसमोर ठेवून त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काम करणार्या नेतृत्वाचे आणि सहकार्यांची एक प्रचंड संख्या होती, असे पवार यांनी सांगितले. यावेळी रावसाहेब पवार यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम इंगळे यांनी सूत्रसंचालन जितेंद्र देवकर यांनी तर संदीप टिळेकर यांनी आभार मानले.
रावसाहेब पवार यांनी एक निवडणूक लढली होती आणि त्या निवडणुकीमध्ये ते जिंकले होते जिंकल्यानंतर त्यांचे पोस्टर लावायला कार्यकर्ते आले की फोटो मला द्या पोस्टर लावायचा आहे तर याच्यावर रावसाहेब पवार म्हणाले फार यश आलं तर फार वाहत जायचं नाही पोस्टरमध्ये वेळ वाया घालवायचा नाही आपण साधी काम करणारी माणसे आहोत आपण कामाला लागले पाहिजे. असे रावसाहेब पवार यांचे उदाहरण माझ्यासमोर आहे त्यामुळे मी फार पोस्टर लावण्याचे भानगडीत पडत नाही.
– सुप्रिया सुळे, खासदार





