Pune District : किल्ले शिवनेरीवर आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह

जुन्नर – भारताची प्राचीन परंपरा असलेल्या योग सादरीकरणाचा उत्साह किल्ले शिवनेरीवर आज पहायला मिळाला. औचित्य होते आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सादरीकरणाचे.
शिवजनमस्थळावरील आकाशात जमलेल्या निळ्या-पांढर्या ढगांच्या सानिध्यात आणि झाकोळलेल्या कुंद वातावरणात योगासनांची उबदार उर्जा सर्वांचाच आनंद द्विगुणित करुन गेली. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने या योग साधना उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून शिवजन्मस्थळी हे आयोजन करण्यात आले होते.
पुरातत्व खात्याचे अधिक्षक उप अभियंता संजीव मंडल, सर्वेक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले, सहाय्यक पुरातत्वज्ञ रवीराज, तालुका क्रीडा अधिकारी शोभा खेडेकर पालवे, निवासी नायब तहसिलदार सारिका रासकर, यांच्यासह जुन्नरच्या श्री. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या आणि ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी या योगदिनाच्या उपक्रमात सहभाग घेतला.
योगअभ्यासक विजय गुंडे यांनी उपस्थितांना या निमित्ताने योगाचे धडे देत उपस्थित सहभागींकडून योगमुद्रांचे सादरीकरण करुन घेतले. सूर्योदयाच्या साक्षीने शिवजन्मस्थळी विखुरलेल्या किरणांच्या पखरणीत योगउर्जेचा हा उत्साह उपस्थितांना आगळी उर्जा देत होता. भारतीय पुरातत्व विभाग मुंबई सर्कलच्या वतीने संभाजीनगरमधील एलिफंटा, पुण्यातील आगाखान पॅलेस आणि किल्ले शिवनेरीवर या विशेष योग सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.





