Pune District : कळस रस्त्यावर दुतर्फा गतिरोधक बसवा

कळस – येथील रस्त्याच्या दुतर्फा गतिरोधक बसविण्याची मागणी येथील नागरिकांसह पालक वर्गामधून होत आहे. गावामधून डाळज नं. 2 चौफुला ते जंक्शन रस्त्याचे नव्याने रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. हा रस्ता कळस गावाच्या मुख्य चौकातून गेलेला असल्याने गावातील रस्त्याच्या दुतर्फा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हॉटेल, छोटे-मोठे दुकाने तसेच बँका, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आहे. त्यामुळे या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
हा रस्ता डाळज नं. 2 चौफुला येथून जाणार्या पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला असून, तो पुढे जंक्शन येथील औद्योगिक वसाहतीला जोडलेला आहे. या रस्त्यावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. सध्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने रस्त्यावरून सर्वच वाहनांचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कदाचित एखाद दुसरा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने चौकादरम्यानच्या दुतर्फा तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी येथील नागरिकांसह पालकवर्गाने केली जात आहे.
येथील श्री हरणेश्वर विद्यालयाच्या मुख्य गेटचा दरवाजा या रस्त्याचे नव्याने रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे विद्यालयाकडून येताना या ठिकाणी दहा फूट अंतरावर जवळून हा रस्ता गेलेला असल्याने या रस्त्यावर छोटी, मोठी वाहने चढवताना वाहन चालकांना तारेवरची करून वाहन चालकांना आपले वाहन रस्त्यावर चढावे लागत आहे.
त्यामुळे येथील गेट पर्यायी ठिकाणी करावे, त्या बरोबर विद्यालयाच्या भिंती बाहेरच्या मुख्य रस्त्या लगत विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी सुसज्ज असा पर्यायी रस्ता करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावर न येता पर्यायी मार्गाने ये, जा करता येईल. त्यामुळे होणारी दुर्घटना टळेल इत्यादी उपाययोजना संबंधितांनी तातडीने कराव्यात.





