– मंचर येथे हौशी चालकाचा कारनामा मंचर – मंचर एसटी बस स्थानकासमोर निवारा लॉज येथे निवासी आलेल्या प्रवाशापैकी एकाने इनोव्हा कार सुरू केल्यानंतर कारवरील ताबा सुटून इनोव्हा कार थेट निवारा लॉजच्या व्यावसायिक गाळयाजवळ असणाऱ्या पायऱ्यावर अडकल्याने होणारी मोठी दुर्घटना रविवार दि.१३ रोजी टळली. इनोव्हा कार पुढे आल्याने अचानक घडलेल्या घटनेमुळे काही वेळ परिसरात धावपळ झाली. घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. काही वेळातच क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढण्यात आली.एम एच ०६ बीयु ०८९१ या कारमध्ये भाविक हे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले होते. रात्री दर्शन घेऊन आल्यानंतर काही वेळ ते निवारा लॉज येथे विश्रांतीसाठी थांबले असल्याचे सांगण्यात आले. त्यातील हौशी चालकाने कार चालू करण्याचा चालकाच्या सहमती शिवाय प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.