राजगुरूनगर : सांडभोरवाडी (तिन्हेवाडी) हद्दीत असलेल्या इंदिरा पाझर तलावाची पाणी पातळी झपाट्याने घटली आहे. धरणाच्या तळाला मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने वरवर पाणीसाठा दिसत असला तरी काही दिवसांत हे पाणी संपुष्टात येण्याची भीती असून पाच गावांच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. इंदिरा पाझर तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने सांडभोरवाडी (तिन्हेवाडी) सह जैदवाडी, वरची भांबुरवाडी, तुकाईवाडी (ता. खेड) आणि पेठ (ता. आंबेगाव) अशा पाच गावांच्या पाणी योजना विस्कळीत होणार आहे. सध्या या पाचही गावांना मुबलक पाणीपुरवठा होत आहे; परंतु पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काही दिवसात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाच्या जुन्या खेड घाटा लगत इंदिरा पाझर तलाव आहे. 1971 मध्ये झालेल्या या पाझर तलावाचा परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी उपयोग होत आला आहे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार आणि खेड तालुक्यातील सौरंग्या डोंगर रांगामधून ओढ्याने येणार्या पावसाळ्यातील पुराच्या पाण्यावर या तलावाचा पाणीसाठा अवलंबुन आहे. तर दरवर्षी साठणार्या पाण्यावर खेड आणि आंबेगाव तालुक्यातील पाच गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच शेतीसाठी हे पाणी वरदान ठरले आहे. 50 वर्षांपासून गाळच काढलेला नाही पाझर तलावाच्या माती बांधाची उंची कमी असल्याने मोजकेच पाणी साठते. त्यातही तलावात 50 वर्षांपासून गाळ साठत आला आहे. त्यामुळे पाणी साठ्यात मर्यादा येत आहेत. नाम फाउंडेशनकडून धरणातील गाळ काढण्यासाठी मोठे अर्थसहाय्य आणि यंत्रणा देखील उपलब्ध करून दिली जाते; मात्र शासकीय प्रस्ताव आणि मंजुरी यामध्ये उन्हाळा निघुन जातो.असे दरवर्षी होत असल्याने तलावातील गाळ काढण्यात अडचणी येत असल्याबाबत वरची भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, जैदवाडीच्या सरपंच शीतल जैद यांनी सांगितले. इंदिरा तलावाच्या पाणी साठा अत्यल्प आहे. चासकमान धरणाच्या राजगुरूनगर नगरजवळून वाहणार्या डाव्या कालव्यातून धरणात सिंचन प्रकल्प राबवावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच तलावाची पुर्वीची खोली कायम करण्यासाठी गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. काही प्रमाणात गाळ काढण्यात येत आहे. – प्रतीक्षा पाचारणे, सरपंच, सांडभोरवाडी तथा महिला अध्यक्ष, खेड तालुका सरपंच परिषद पूर्व भागातील गावांना टँकरने पाणीपुरवठा खेड तालुक्यातील अनेक गावातील पाणी योजनांच्या पाणीपुरवठा करणार्या विहिरींनी तळ गाठले आहेत. तालुक्यातील काही गावातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पूर्व भागातील गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यावर्षी मान्सून लवकर असल्याचे सांगितले जाते मात्र तो लवकर दाखल झाला नाही तर जून महिन्यात पाणीटंचाईचे भीषण संकटाला सर्वाना तोंड द्यावे लागणार आहे. तिनही धरणांनी गाठला तळ तालुक्यातील भामा आसखेड, चास कमान धरण आणि कळमोडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.भामा आसखेड धरणात 16 टक्के, चास कमान धरणात 9.49 टक्के तर कळमोडी धरणात 23 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस झाला नाही तर पाणी संकट वाढणार आहे. तीनही धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये) धरण*** पाणीपातळी***एकूण साठा***उपयुक्त साठा***टक्केवारी***विसर्ग (क्युसेकमध्ये) चासकमान*** 632.12***47.55*** 20.36***9. 49*** डाव्या कालव्यातून 560 भामा आसखेड ***653.95***48.62***35.10***16. 17*** आयसीपीओमधून 1200 कळमोडी***669.07***10.28***10.08***23. 62