पुणे जिल्हा : संगणक परिचालकांचे बेमुदत कामबंद

पुरंदर तालुक्यातील 65 जण आंदोलनात सहभागी
12 वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर परिचालक कामावर
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
सासवड – संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, 20 हजार रुपये मासिक मानधन देणे या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवार (दि. 17) पासून पुरंदर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कामबंद आंदोलनाचे निवेदन पुरंदर तालुका गटविकास अधिकारी व तालुका व्यवस्थापक अभिजीत सोनवणे यांना देण्यात आले, त्यात पुरंदर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीतील सुमारे 65 संगणक परिचालक कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप गिरे यांनी सांगितले.
संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील 12 वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक काम करीत आहेत. शासनाने त्यांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकांना सामावून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, संगणक परिचालकांना सदर दर्जा मिळेपर्यंत मासिक 20 हजार मानधन देणे, नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करणे या प्रमुख मागण्यांकडे आश्वासन देऊनही दुर्लक्ष केले. सुधारित आकृतीबंधाबाबत काहीच हालचाल झालेली नाही. शासन वेळकाढूपणा करीत असल्याची भावना संगणक परिचालकांनी व्यक्त केली.
एकीकडे कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यायचे नाही व दुसरीकडे केवळ 6 हजार 930 रुपये मासिक मानधन द्यायचे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली आहे; परंतु संगणक परिचालकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप गिरे, सचिव प्रवीण कापरे, खजिनदार अमोल नागवडे, भाऊ खोमणे व पुरंदर तालुका संगणक परिचालक संघटना उपस्थित होते.
वाढती महागाई परिवार मुलांचे शालेय शिक्षण 6930 रुपये या मासिक मानधनात आमचं घर कसे चालायचे? आम्ही आमच्या हक्कासाठी काम बंद आंदोलन केला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन असेच सुरू राहणार.
– भाऊ खोमणे, संगणक परिचालक, खानवडी





