पुणे जिल्हा : तळेगाव गटात टक्का कोणाच्या पथ्थ्यावर?

राष्ट्रवादीतील दोन गट आमने -सामने : झेडपीवर गणित मांडले
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्याच्या राजकारणात तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट महत्वाची भूमिका बजावतो. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात यंदा लोकसभेला मतदानाचा टक्का घसरला असल्याने हा टक्का नक्की कोणाच्या पथ्यावर पडतो, हे पाहणे गरजेचे आहे. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या शिरूर लोकसभेच्या रणांगणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. त्यामुळे तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात कोणाच्या बाजूने कल मिळणार, याची चर्चा रंगली आहे.
मागील वेळी तळेगाव गटात ६२ टक्के टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र या गटात ५८ टक्के मतदान झाल्याने मतदार राजकीय घडामोडीवर नाराज असल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रियेत यावर्षी प्रथमच मतदान केंद्बावर मोबाइल बंदी केल्याने तसेच मतदान केंद्रावरील मोबाइल बंदीबाबत जनजागृती न झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. मतदान केंद्राबाहेर मोबाइल ठेवण्याची व्यवस्था नसल्याने तसेच महागडे मोबाइल ठेवायची गैरसोय झाल्याने तेथूनच काही मतदारांनी मतदान न करता पाठ फिरवली असल्याचे पाहायला मिळाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीप्रमाणे घरोघरी मतदार आणण्याची व्यवस्था पक्षीय कार्यकर्त्याकडून अपेक्षित होते. ती देखील झाली नाही. युवावर्ग व नवमतदार हे प्रथमच मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित असताना राजकीय कलह व घडोघडी बदलते राजकारण यामुळे नवमतदार यांनी तटस्थ भूमिका बजावत मतदान प्रक्रीयेपासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसून आले.
मागील २०१९ लोकसभेच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे व शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेकडून एकमेकासमोर ठाकले असतना कडवी झुंज होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन टर्म खासदार राहिल्याने जनमानसात त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली होती. त्यांच्या पुढे प्रतिस्पर्धी म्हणून अनेक उमेदवार कुचकामी ठरत होते.
त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टी यांनी अभिनय शेत्रातील नवीन चेहरा डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवार म्हणून शिरूरच्या मैदानात उतरवले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब भूमिका साकारून जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविल्याने मतदार त्यांच्या भूमिकेवर आकर्षित होऊन मागील निवडणुकीत मतदारांनी त्यांना साथ दिली. ओबीसी फॅक्टरचा देखील कोल्हे यांना फायदा झाला होता.
संघटन, विकासकामांवर भर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काळात अर्थमंत्री असताना शिरूरच्या विकासावर विशेष भर दिला होता. तालुक्यात अनेक पदाधिकारी सक्रीय केले होते. तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी नेमताना विशेष लक्ष देत असल्याने येथील मूळ राष्ट्रवादी पक्षाचे विभागणी जरी झाली असली तरी पक्षाची बांधणी करण्यात त्यांना यश आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर आढळराव यांचा पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारी देत शिरूर लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण केली होती. भारतीय जनता पार्टीने देखील विविध विकासकामांवर भर देत पक्ष कार्यकारिणी मजबूत केली होती. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
शेती, महागाई, सत्तांतरावर नाराजी
राजकीय बदलाने व सत्तांतर यामुळे यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे वेगळी होती. त्यातच मराठा आरक्षण हा मुद्दा अनेक दिवस चर्चेत होता. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या व पशुपालक यांच्या अडचणीत झालेली वाढ तसेच वाढलेली महागाई आदी मुद्दयांमुळे सत्ताधाऱ्यावर मतदरांचा काही प्रमाणात विशिष्ट रोष पाहायला मिळाला. हेच मुद्दे विरोधकांनी निवडणुकीचा अजेंडा जनतेसमोर प्रचाराच्या माध्यामतून मांडल्याने तसेच शरद पवार व शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या गटात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.





