पुणे जिल्हा : सविंदणेमध्ये दाम्पत्याला मारहाण करत जबरी चोरी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे) : येथील सविंदणे – कवठे रस्त्यावरील नरवडे मळा याठिकाणी आज पहाटे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून एका दाम्पत्यास जबर मारहाण करत जबरी चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
संभाजी नरवडे यांच्यासह त्यांच्या पत्नीला यावेळी चोरटयांनी मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजी नरवडे आणि त्यांच्या पत्नी बबूबाई नरवडे यांना चोरटयांनी जबर मारहाण केली आहे. बबूबाई यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र, मोहन माळ, जोडवी, कानातील कर्णफुले असा अंदाजे दहा तोळयाचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. तसेच घरातील तीन हजार रोख रक्कम घेऊन गेले आहे.
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत संभाजी नानाभाऊ नरवडे (६७ ) बबुबाई संभाजी नरवडे ( ६० ) हे गंभीर जखमी झाले असून गावातील नागरीकांनी त्यांना सह्याद्री हॉस्पीटल पुणे येथे ऊपचारासाठी दाखल केले आहे.
या दाम्पत्याच्या घराशेजारी कुठलेही घर नाही. त्यात मुलगा बाहेरगावी नोकरीसाठी वास्तव्यास आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे हे दाम्पत्य भयभीत झाले आहे. या घटनेमुळे गावातील व परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





