आमदार राहूल कुल यांची मागणी पारगाव – आषाढीवारी २०२५ दरम्यान लाखो वारकरी श्री विठोबा-रूखमाई चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘विठ्ठल-रूखमाई वारकरी योजना २०२५’ लागू करून अपघाती मृत्यू, अपंगत्व व इस्पितळ खर्चासाठी आर्थिक मदतीची तरतूद केली आहे. परंतु, वारी दरम्यान हृदयविकाराचा झटका, रक्तदाब वाढणे, साथीचे आजार, अथवा थकव्यामुळे नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या वारकऱ्यांना योजनेत सध्या मदत मिळत नाही. यामध्ये सुधारणा करून नैसर्गिक मृत्यू व आजारांना देखील समाविष्ट करण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी शासनाकडे केली आहे. वारीदरम्यान काही वारकऱ्यांचा अचानक रक्तदाब वाढल्याने, हृदयविकाराच्या झटक्याने तसेच चालून आलेल्या थकव्यामुळे मृत्यू झाला आहे. काहींना साथीचे ताप, फुफ्फुसाचे विकार, आणि पायाला चिखलामुळे झालेला सेप्टिक यामुळे अनेक दिवस इस्पितळात दाखल करावे लागले आहे. परंतु सद्य:स्थितीत केवळ अपघात व नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू झाल्यासच आर्थिक मदत मिळते. त्यामुळे या योजनेंतर्गत नैसर्गिक मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही रु. ४ लाखांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आमदार कुल यांनी शासनाकडे केली आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास मिळणारी मदत अपुरी असून, उपचाराचा खर्च लक्षणीयरीत्या वाढलेला आहे. म्हणून ही रक्कम वाढवावी, किंवा सर्व वारकऱ्यांना “मुख्यमंत्री सहायता निधी” तसेच “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” अंतर्गत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे. शासन निर्णयात वारकऱ्यांचा समावेश करा शासनाने दि. १ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात निर्णय घेतला असून, ही योजना ३० जुलै २०२५ पर्यंत लागू आहे. या कालावधीतच सुधारित शासन निर्णय जारी करून, वारी दरम्यान चालत असताना हृदयविकाराने वा अन्य नैसर्गिक कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांचाही समावेश या योजनेत करावा, असा आग्रह आमदार राहुल कुल यांनी शासनाकडे धरला आहे.