Pune District: पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील जुन्नर व मढ महसूल मंडळातील 23 गावांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
जुन्नर महसूल मंडलातील पारुंडे, येणेरे, काले, दातखिळवाडी, बुचकेवाडी, काटेडे, विठ्ठलवाडी, गोळेगाव, आलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ, गोद्रे, कुमशेत, आगर, सोमंतवाडी, पाडळी, बागायत बुद्रुक व खुर्द, हापुसबाग, बादशाह तलाव आणि जुन्नर येथे रविवारी (दि.13) अतिवृष्टी झाली. तर मढ महसूल मंडलातील पारगाव तर्फे मढ, सितेवाडी, वाटखळे, बगाडवाडी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अतिवृष्टी झाली. गारपीट व अतिवृष्टीमुळे बाधित गावांतील कांदा,आंबा व इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोद्रे आणि कुसूर गावांतील घरांची कौलं आणि पत्रे उडाल्याने घरांचेही नुकसान झाले आहे.
गारपीट आणि अतिवृष्टीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी तहसीलदार अनंथा गवारी, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, कृषी अधिकारी गणेश भोसले, मंडल अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदींसमवेत मढ महसूल मंडलातील वाटखळे, पांगरी गावाची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकर्यांशी चर्चा करुन त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच अतिवृष्टी व गारपीट झालेल्या गावातील पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. तसेच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यासाठी प्रस्ताव राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाला सादर करावा असे निर्देश दिले.
यावेळी तुषार थोरात, अंकुश आमले, तुळशीराम भोईर, नितीन घोलप, ईश्वर घोलप, गोरक्षनाथ घोलप, सुनील घोलप, रवींद्र घोलप, शिवाजी घोलप, तुकाराम घोलप, कुशाभाऊ घोलप, सुनील दिघे, दत्तात्रय दिघे, विश्वनाथ घोलप, तुकाराम दिघे, मारुती दिघे, सखाराम घायवट, राम दिघे, शांताराम दिघे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.





