Pune District : कालव्याच्या भरावासाठी अवैध मुरूम उत्खनन

वनविभागाकडून यंत्रसामग्री जप्त : मशीन चालकांनी काढला पळ
काटेवाडी – काटेवाडी (ता. बारामती) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 224 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन करताना वन विभागाची मोठी कारवाई उत्खननासाठी वापरलेली यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
काटेवाडी वन विभागाच्या परिक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन होत असल्याची परिसरात चर्चा होती त्यासंबंधी माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाचे कर्मचारी परिक्षेत्रात गस्त घालत असताना काटेवाडी वनपरिक्षेत्रातील सर्वे नंबर 224 मध्ये गस्तीदरम्यान, काही व्यक्ती बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन करत असल्याचे आढळून आले. त्यावेळी दोन पोकलन मशीन यंत्र सामग्रीच्या माध्यमातून मुरूम उत्खननाचे काम सुरु होते. वनविभागाच्या कर्मचारी, वाहनाचा ताफा दिसताच पोकलेन मशीन चालकांनी पळ काढला.
वन विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर224 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन करताना घटनास्थळी दोन पोकलेन मशीन यंत्र सामग्री आढळून आली ती सर्व यंत्र सामग्री वनरक्षक बी. व्ही. गोलाडे, वनपाल एस. आर. उंडे यांनी ताब्यात घेतली आहे. अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक वनसंरक्षक अतुल जैनक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे पुढील तपास कारित आहेत.
दरम्यान नीरा डावा कालवाच्या दोन्ही बाजूचे भराव मुरुमाने भरून घेण्याचे काम इंदापूर तालुक्यातील एका मोठ्या उद्योजक ठेकेदाराला मिळाले आहे. मागील मे महिन्याच्या अखेरीस लिमटेक व काटेवाडी येथे कॅनॉल फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या प्रार्श्वभूमीवर कॅनाल खोलीकरण, दोन्ही बाजूंनी भराव मुरुमांनी भरून सपाटीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता भासत आहे. कालव्याच्या कडेला पांटबधारे विभागाच्या जागेतून मुरूम उचलत असल्याचे भासवत पाटबधारे विभागाच्या हद्दीसह वन परिक्षेत्रातील जागेतील उत्खनन करून मुरूम मोठ्या प्रमाणात उचलला जात आहे.
शासनाची रॉयल्टी भरून मुरूम घेण्याऐवजी, संबंधित ठेकेदारांनी काटेवाडी वनपरिक्षेत्र भागात बेकायदेशीर उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मुरूम उचलला असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. नीरा डावा कालवा दोन्ही बाजूने मुरूम भरला जात आहे. संबंधित ठेकदाराकडे स्वतःची यंत्रसामग्री असतानाही बाहेरील दोन पोकलेन मशीन भाडेतत्वावर काम करत आहेत. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.





