पुणे जिल्हा : लकी ड्रॉ वाला मी आमदार नाही : अतुल बेनके

जुन्नर शहरातील विकास कामांसाठी ६२ कोटींचा निधी
जुन्नर : ऐतिहासिक जुन्नर शहरातील हिंदू-मुस्लिम समाज बांधवांच्या विविध विकास कामांकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आतापर्यंत ६२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुक्याच्या शाश्वत विकास करावयाचा असून निवडणुकीच्या वेळी तीन चार महिन्यांत काय कामे होतात. यापेक्षा पाच वर्षांत किती विकास कामे झाली, याचा विचार सुज्ञ मतदारांनी करावा. लकी ड्रॉ वाला मी आमदार नाही, असे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी स्पष्ट केले.
जुन्नर नगर परिषद हद्दीमधील सुमारे ७ कोटी खर्चाच्या २४ विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार बेनके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रविवार पेठ, वरचा माळी वाडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डी. डी. डोके, उज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, कविता छाजेड, धनेश संचेती, भाऊ कुंभार, एकनाथ सराईकर, धनराज खोत, संजय डोके, हितेश शहा, मयूर महाबरे आदींसह शहरातील विविध भागांतील नागरिक उपस्थित होते.
नगर परिषद हद्दीमध्ये शासन निधी वापरून विकास कामे करतानाचा एक नियम होता. त्यामध्ये संबंधित जागा नगर परिषदकडे हस्तांतरित केल्याशिवाय निधी दिला जात नव्हता. परंतु राज्यातील महायुती शासनाने यामध्ये धोरणात्मक बदल करून केवळ एनओसीच्या आधारे निधी खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली असल्याने त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊन त्यातून विकास कामे होत असून आतापर्यंत शहराकरिता ६२ कोटीचा निधी विकास कामांकरिता मंजूर करून आणलेला आहे.
त्यामध्ये हिंदू मुस्लिम समाजाकरिता बहूउद्देशीय इमारत, सभा मंडप, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सिमेंट रस्ते, पाईप गटारी, व्यायाम शाळा, संरक्षक भिंत, सभागृह बांधकाम, मशीद, कब्रस्थान, विकास कामे या करिता शासन निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार बेनके यांनी यावेळी सांगितले.





