सातबारावरील दुरुस्तीसाठी मध्यस्थांमार्फत लाच मागितल्याचा आरोप सुरेखा नाईकनवरे यांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू राजगुरुनगर – आंबेठाण (ता. खेड) येथील जमिनीच्या जुन्या सातबारा उतार्यावरील दुरुस्ती (155 अंतर्गत) मागणी प्रकरण रद्द केल्यावरून तसेच त्या दुरुस्तीसाठी मध्यस्थांमार्फत लाच मागणी करण्यात आल्याचा आरोप करीत त्या विरोधात वारसदार असलेल्या सुरेखा बाळु नाईकनवरे यांनी मंगळवारी (दि 22) तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात खेड तालुक्यातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या प्रकरणी तहसीलदार यांची खातेनिहाय चौकशी करून तहसीलदार बेडसे यांच्यासह दोषींवर निलंबनाची मागणी केली आहे. चाकण एम आय डी सी मधील आंबेठाण गावच्या हद्दीत गट क्रमांक 157 असून 2 हेक्टर 25.25 आर क्षेत्र असलेल्या जमीन सातबारा दुरुस्ती करण्यासाठी सुरेखा नाईकनवरे यांनी तहसीलदार खेड यांच्याकडे प्रकरण सादर केले होते..सन 1964 पर्यंत सातबारा उतार्यावरील नोंदी बरोबर होत्या. त्यानंतर त्यात बदल झाला. त्याची दुरुस्ती करण्याकामी वारसानी 4 एप्रिल 2024 मध्ये तेव्हाच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनी तीन सुनावण्या घेतल्या. नंतर प्रशांत बेडसे तहसीलदार म्हणुन रुजु झाले. त्यांनी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे दाद मागावी, असे पत्र देऊन हे प्रकरण निकाली काढले. दरम्यान, या काळात तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मध्यस्थांमार्फत तक्रारदारांकडे मध्यस्थी माध्यमातून अर्थपूर्ण मागणी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे हरेश देखणे, संदीप साळूंके, विकास शिंदे, सोनू काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास साडभोर, राम गोरे, वंचित बहुजन आघाडीचे, आरपीआयचे दिलीप नाईकनवरे, बाळासाहेब नाईकनवरे, वंचित चे महेंद्र नाईकनवरे, तुषार गायकवाड व इतर सहभागी झाले होते. सबंधित प्रकरणी 1964-65 मध्ये बदल झाला आहे.2018 मध्ये अर्ज दाखल झाला असून तो नियमात बसत नाही. गटवारी योजनेच्या अगोदरच्या नोंदीत तहसीलदार स्तरावर हस्तक्षेप करता येत नाही. त्यांना जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडे दाद मागावी, असे आवाहन केले आहे. काही मागणी झाल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यासाठी जे कोणी मध्यस्थी असतील त्यांच्या विरोधात तक्रार केली पाहिजे. – प्रशांत बेडसे, तहसीलदार खेड.