सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड नेहमीच वेगवेगळ्या मुद्याने चर्चेत असते. कधी राजकारण तर कधी समाजकारण. तर कधी अवैद्य व्यवसाय सासवड आता आजी-माजी आमदारांच्या लागलेल्या मोठं मोठ्या बँनरमुळे चर्चेत आले आहे. परंतु याच बॅनरमुळे नगरपरिषदेमध्ये असणारे राष्ट्रपुरुषांचे पुतळे झाकले गेले आहेत; परंतु यावर मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नगरपरिषदेने झोपेचे सोंग घेतले आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महापुरुषांचे पुतळे झाकल्यामुळे समाजामध्ये होर्डिंग धारकांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर नगरपरिषद प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे. मागील काळात महायुतीच्या महाविजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि विजय शिवतारे यांचे मोठे होर्डिंग लावले आहेत. तर आता नगरपरिषदेसमोर संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यात मोठा बॅनर वॉर रंगताना दिसत आहे. आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी सासवड नगर पालिकेच्या समोर लावलेल्या होर्डिंग्ज मुळे मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत सासवड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. शायरीद्वारे आजी-माजी आमदारांचे टोमणे माजी आमदार संजय जगताप यांच्या बँनरमध्ये काळोख कितीही घनदाट असला तरी सूर्याला थांबविण्याची ताकत परमेश्वराने अजून कोणाला दिलेली नाही असा आशय नमूद केला आहे. तर जगताप यांच्या दुसर्या बॅनर वर शेरो शायरी करण्यात आली आहे. कुछ लोग हमारा नाम मिटाना चाहते है,नादान है वो लोग जो, समंदर को सुखाना चाहते है अशा शायरी आहेत. दुसर्या बाजूला आमदार विजय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष 2025 सासवड नगरपरिषदचा उल्लेख करत बॅनरवर मै समंदर से भी गहरा हू तुम किटने कंकड फेकोगे चून चून कर आगे बढुंगा मै तुम मुझको कब तक रोकोंगे अशी शायरी लिहिली आहे. विशेष म्हणजे या बॅनर वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हसतानाचा फोटो लावला आहे, त्यामुळे संपूर्ण तालुक्यात या बॅनर वॉरची चर्चा मोठी रंगलेली दिसत आहे. सासवड (ता. पुरंदर) : नगरपरिदेच्या आवारात लावण्यात आलेल्या बॅनबाजीमुळे महापुरुषांचे पुतळे झाकोळले गेले आहे.