पारगाव – दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबीयाला २५ लाखांची मदत देण्यात आली. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने हा निधी मिळाला आहे. एका शेतामध्ये ऊस तोडणी करीत असताना मजूर विष्णू करण मोरे यांच्या ३ महिने वय असलेल्या लहान बाळाचा बिबट्याने हल्ला केला. यात चिमुकलीचा बळी गेला. (दि.१७) नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना घडली होती. कुटुंबातील सदस्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने एकूण २५ लाख रुपयांची मदत शासनाने वन विभागामार्फत जाहीर केली होती. मुलाच्या आई-वडिलांना आमदार कुल यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अंकुश खरात, वनरक्षक शितल मेरगळ उपस्थित होते.