राजगुरुनगर : “हॅलो.. मी दिलीप मोहिते बोलतोय.. काही वेळ काम बंद ठेवा. मात्र शेतकऱ्यांची अडचण करू नका.’ असा कॉल आला आणि ठेकेदाराने वाहन लावुन बंद केलेला राजगुरुनगर येथील वाडा रस्ता तात्पुरता खुला केला. यानंतर चार तासाहून अधिक वेळ प्रांत कार्यालया जवळ उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या उसाने भरलेल्या दोन ट्रक मार्गस्थ झाल्या. राजगुरुनगर शहरात बुधवारी (दि. २७) घडलेल्या या प्रकारामुळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कॉल आणि त्यानंतर होणाऱ्या कामाचा अनुभव कोहीनकरवाडी व सातकरस्थळ येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा घेतला. उत्तर पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने खेड तालुक्यात ऊस तोडणी सुरू आहे. राजगुरुनगर परिसरालगत असलेल्या काही गाव, वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांचा तोडणी केलेला ऊस ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून तो मुख्य रस्त्याने म्हणजेच वाडा रस्त्याने नेला जातो. इतर रस्ते आहेत. मात्र, लहान किंवा रस्त्यावरून जाताना वीज वाहक तारा कमी उंचीवर असल्याने तेथून उंच रचलेली ऊस वाहतूक करता येत नाही. दरम्यान, राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. दिलावर खान दर्ग्याजवळ पुलावर काम चालू असल्याने येथे रस्ता बंद केला आहे. लहान वाहने ये- जा करण्याची इतर मार्गाने सोय केली आहे. मात्र, अवजड वाहतूक वाडा रस्त्याने करावी लागते. सातकरस्थळ परिसरातील राजेंद्र वाळुंज, साहेबराव सातकर, कोहिणकरवाडीचे ऊसउत्पादक नारायण भगवान कोहिणकर यांचा ऊस घेऊन ट्रक निघाले. मात्र, रस्ता बंद केल्याने ट्रक प्रांत कार्यालयाजवळ बॅरीकेट लावले आहेत. आवारात ट्रक थांबवले. सकाळी आठ वाजता हे ट्रक येथे थांबवले. चौकशी करता सायंकाळी रस्ता खुला केला जाईल, असे सांगितले. तोपर्यंत वाहतूक कोंडी असल्याने ट्रक थांबल्याने नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. अनेकजण ट्रकवर चढून ऊस काढून घेऊ लागले. शेतकरी हैराण झाले. गाव पुढाऱ्यांना फोन केला. उपयोग झाला नाही. चार ते पाच तास जागेवर गेले. अखेर एकाने नुकतेच मोहिते पाटील यांना कॉल केला. त्यांनी लगेचच ठेकेदारी संबधीत व्यक्तीला संपर्क साधला. परत शेतकऱ्याला कॉल केला. थोड्या वेळात गाड्या सोडतील, असे सांगितले. काही वेळाने वरीलप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव आला. रस्त्यावर काम करीत असलेली यंत्रणा हलवली. आडवी लावलेली वाहने दूर केली. चार तासांनी उसाने भरलेले ट्रक मार्गस्थ झाले. सातकरस्थळचे माजी सरपंच मारुती सातकर यांनीही ट्रक मार्गस्थ व्हावेत, यासाठी प्रयत्न केले. एकूणच माजी आमदार मोहिते पाटील यांची कार्य तत्परता पुन्हा शेतकऱ्यांनी अनुभवली. हाकेला ओ देणारा माजी आमदार मोहिते पाटील बाहेरगावी असतानाही त्यांनी शेतकऱ्यांचा आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचा प्रश्न तात्काळ सोडविल्याने मोहितेंचा काम करण्याचा करिष्मा सर्वांना अनुभवयास मिळाला.