पुणे जिल्हा : पारगाव- केडगाव गटात कुल गटाची सरशी

रमेश थोरात यांची आगामी निवडणुकीत कसोटी
त्रिभूज शेळके
पारगाव : माजी आमदार रमेश थोरात यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या केडगाव-पारगाव जिल्हा परिषद गटात आमदार राहुल कुल यांनी १६२० मतांची आघाडी घेतली आहे. या संवेदनशील गटात आमदार कुल गटाची सरशी झाल्याने रमेश थोरात यांना चांगलाच धक्का दिला आहे. आगामी झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत रमेश थोरात गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
दौंड विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राहुल कुल व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून रमेश थोरात हे पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे होते. या निवडणुकीत राहुल कुल हे १३, ८८९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यातील केडगाव-पारगाव जिल्हापरिषद गटात आमदार राहुल कुल यांनी १६२० मतांची आघाडी घेतली आहे. केडगाव-पारगाव गटात १२ गावे आहेत. यातील पारगाव, केडगाव, गलांडवाडी, पिंपळगाव या गावांमधून विक्रमी मतदान झाले आहे.
त्यातील केडगाव पंचायत समिती गटात केडगाव, वाखारी, दापोडी, खोपोडी, गालांडवाडी ही पाच गावे तर पारगाव पंचायत समिती गटात पारगाव, देलवडी, एकेरीवाडी, नाथाचीवाडी, लडकतवाडी, पिंपळगाव, नानगाव ही सात गावे आहेत. मागील वेळेस या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या राणी शेळके या निवडून गेल्या होत्या.
मागील अनेक वर्षांपासून या गटावर माजी आमदार रमेश थोरात यांची एकहाती सत्ता आहे. परंतु या निवडणुकीत राहुल कुल यांना पारगाव पंचायत समिती गटातून १३६० मतांची व केडगाव पंचायत समिती गटातून २५७ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जर हेच गट राहिले तर माजी आमदार रमेश थोरात यांची कसोटी लागणार हे मात्र नक्की.
पाच वर्षांत अनेक ग्रामपंचायत, सोसायटी काबीज
आमदार राहुल कुल यांनी मागील पाच वर्षांत गावपातळीपर्यंत नियोजन केले आहे. विकासकामे करीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्याचा थेट परिणाम ग्रामपंचायत, विकास सोसायटीच्या निवडणुकीत झाला आहे. थोरात गटाकडे असणाऱ्या अनेक ग्रामपंचायती कुल गटाने खेचून आणल्या आहेत. त्यामुळे गावात सत्तेत आल्यानंतर विकासकामे, जनतेशी थेट संपर्क या जोरावर झेडपी गट काबीज केल्या आहेत. त्याचा फायदा यावेळी निकालातून दिसून आला आहे.
केडगाव-पारगाव गटातील गावनिहाय मतदान पुढीलप्रमाणे-
पारगाव पंचायत समिती गण
गाव राहुल कुल रमेश थोरात
पिंपळगाव- १९१५ १२८४
नाथाचीवाडी- १०६७ ९१९
एकेरीवाडी- ५३९ ७५२
लडकतवाडी- ५८५ ४४४
देलवडी – ११९६ १२९९
पारगाव – २९५४ २२८६
नानगाव – १७४६ १६५५
१०’००२2 ८६३०
केडगाव पंचायत समिती गण
गाव राहुल कुल रमेश थोरात
केडगाव- ४८३३ ३९४५
दापोडी- १३३५ ११७६
खोपोडी- ३४७ ४०८
गलांडवाडी – १०५४ ६३६
वाखारी – ७७३ ८२०
८३४२ ८०८५





