पुणे जिल्हा : जांभळकरांच्या वाहन, बंगल्यावर गुलाल फेकला

करंदीत माजी सभापती जांभळकरांच्या दारात घटना
शिक्रापूर – शिरुर- आंबेगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे देवदत्त निकम व महायुतीचे दिलीप वळसे पाटील अशी लढत होऊन महायुतीचे दिलीप वळसे पाटील विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या शंकर जांभळकर यांच्या बंगल्यासमोर येत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जांभळकर यांच्या वाहनांसह बंगल्यावर गुलाल टाकत घोषणाबाजी केली. काही हुल्लडबाज तरूणांनी हा प्रकार केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
करंदी हे शिरुर- आंबेगाव मतदारसंघातील शिरुर तालुक्यातील बेचाळीस गावातील एक गाव. गावातील बाजार समितीचे माजी सभापती असलेले शंकर जांभळकर हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटात राहिले. त्यांनी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांचा जोरदार प्रचार केला होता. दरम्यान, निकाल जाहीर होताच निकम यांचा निसटता पराभव होऊन अकराशे मताने महायुतीचे वळसे पाटील विजयी झाले. मात्र, यावेळी करंदीतून जांभळकर यांच्या कष्टाने निकम यांना एकशे पन्नासहून अधिक मतांची आघाडी मिळाली.
मात्र, विजयाचा जल्लोष साजरा करताना कार्यकर्त्यांनी डीजे वाजवत जांभळकर यांच्या बंगल्यासमोर येत घोषणाबाजी केली. जांभळकर यांच्या वाहनांसह त्यांच्या बंगल्यावर तसेच गेटच्या आतमध्ये गुलाल फेकत जल्लोष केला. दरम्यान, जांभळकर यांच्या कुटुंबीयांनी याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. जांभळकर यांच्या कुटुंबीयांना देखील दमदाटी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करावी
शिक्रापूर पोलीस निरीक्षकांशी याबाबत चर्चा केली असून घटनेचे चित्रीकरण व फोटो पोलिसांना दिली आहे. या कृत्यातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत तक्रार दाखल करणार असल्याचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले.





