पावसाने घेतली विश्रांती : शेती कामांची लगबग शिक्रापूर – शिरूर तालुक्यात मागील 10 ते 12 दिवस संततधार पाऊस सुरु असल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला होता. अखेर गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे उघडला असल्याने शेतकरी शेतातील कामांना लागले असून सध्या शेतातील भुईमूग पिक काढण्यासाठी शेतकरी मग्न झाल्याचे दिसत आहे. शिक्रापूर सह परिसरातील जातेगाव बुद्रुक, पिंपळे जगताप, मुखई, धामारी, कासारी यांसह आदी भागामध्ये शेतकरी उन्हाळी पीक म्हणून भुईमुग पिकांना पसंती देत असतात, मे महिन्याच्या शेवट अथवा जून महिन्याच्या सुरुवातीला काढणीसाठी येणारा भुईमूग यावर्षी मे महिन्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे शेतातच असल्याने शेतकरी चिंतेत होता. नुकतेच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतात साचलेले पाणी जमिनीत जिरू लागले असल्यामुळे शेतकर्यांनी देखील शेतीची कामे झपाट्याने करण्यावर भर दिला आहे. शेतातील भुईमूग काढून घेण्याची लगबग सुरू केली आहे, तर याबाबत बोलताना आठवडा भरात भरपूर पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांमध्ये साचलेले पाणी पाहून चिंता वाटत होती; मात्र सध्या पाऊस उघडल्याने आम्ही भुईमूग काढून घेण्यासाठी मेहनत घेत आहोत, असे शिक्रापूर येथील शेतकरी सिकंदर शेख व प्रदीप मागाडे यांनी सांगितले.