Pune District: दक्षिणमुखी मारुती मंदिरात द्राक्षांची आरास

सासवड : शहरातील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये मारुती जन्म सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. पहाटे मंदिरातील मारुतीच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला आकर्षक द्राक्षांची आरास करण्यात आली होती, हनुमान भजनी मंडळाच्या सदस्यांनी दिवसभर केलेल्या सुंदर भजनांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
सासवड (ता पुरंदर) येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात सकाळ पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हनुमानाच्या जन्माचा सोहळा विशेष पाळणा गायनाने साजरा करण्यात आला. बुंदी लाडू आणि सुंठवडा वाटप करण्यात आले.
मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर शेकडो भाविकांनी दर्शनासाठी लाभ घेतला. या सोहळ्याचे आयोजन श्री काळभैरवनाथ ट्रस्ट, अजय मंडळ, चांदणी मंडळ, छत्रपती मंडळ, नवजवान मंडळ तसेच अनेक स्थानिक भाविकांनी मिळून केले होते. प्रशांत भैरवकर यांनी पौरोहित्य केले.





