Pune District : जीएमआरटी शेतकर्यांच्या मुळावर?

दरवर्षी लाखो मधमाश्यांवर विषारी औषधांची फवारणी
खोडद ग्रामस्थांची अधिकार्यांवर कारवाईची मागणी
नारायणगाव – खोडद (ता. जुन्नर) परिसरात असलेले जीएमआरटी केंद्र वैज्ञानिक प्रगती करत असले तरी खोडद परिसरातील शेतकर्यांच्या मुळावर उठले असल्याची संतप्त प्रतिक्रिया खोडद ग्रामस्थांनी दिली आहे.
जीएमआरटी केंद्रामुळे जुन्नर तालुक्यात नवीन प्रकल्प येत नाही, शेतमालाच्या दळणवळणासाठी आवश्यक असलेला रेल्वे प्रकल्प निर्माण होत नाही, शहराकडून ग्रामीण भागाकडे आलेल्या युवकांना लघुउद्योग सुरू करावयाचा असल्यास जीएमआरटी एनओसी देत नाही. त्यामुळे खोडद परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळत नाही.
हे काय थोडे म्हणून जीएमआरटी केंद्राकडून त्यांच्या परिसरातील झाडांवर, टॉवरवर व इमारतीवर असलेल्या आगेमोहोळांवर रात्रीच्या वेळी विषारी औषधाची फवारणी करून लाखो मधमाश्यांची हत्या केली जाते. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करून लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. वास्तविक शासन मधुमक्षिका पालनासाठी प्रोत्साहन देत असताना शासनाची यंत्रणा मधमाश्यांचे पोळे नष्ट करीत आहे.
मधमाशी कोणत्याही प्रकारची असो ती शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. निसर्गात मधमाशी परागीभवनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत असते. याशिवाय मध व मेण मिळते. मधमाशी शेतकर्यांची मित्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच मधमाशांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे अशी भावना खोडद ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जर जीएमआरटी केंद्र वर्षातून पाच ते सहा वेळा ठेकेदार पद्धतीने विषारी औषधांचा उपयोग करून लाखो मधमाश्यांची हत्या केली जात असेल तर जीएमआरटीच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल का करू नये?असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मधुमक्षिका अभ्यासक हेमंत डुंबरे म्हणाले की, मधमाशा कधीही स्वतःहून हल्ला करत नाही. आपण त्यांच्या परिसरात जात असताना अंगावर सुगंधी द्रव्याचा उपयोग करणे, दारू पिऊन जंगलात जाणे, लाकडे जाळून धूर करणे यासारख्या नैसर्गिक परिस्थितीच्या विरुद्ध कृती करीत असल्याने मधमाशा हल्ला करतात. आगेमोहळ कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी ते आपली जागा सोडत नाही, असे त्यांनी नमूद केले.
मधमाश्यांचे दोन प्रकार
उजेडात राहणारी मधमाशी यामध्ये आगेमोहोळ व फुलोरी मधमाशी यांचा समावेश होतो. साधारणपणे शिवनेरी किल्ले परिसरात, झाडांवर, भीमाशंकरच्या जंगलात आढळून येतात. आगे मोहोळ व फुलोरी मधमाशी पाळता येत नाही कारण त्यांना अंधारात राहायची सवय नाही.
सातेरी, युरोपियन व डंक रहित मधमाशी हा दुसरा प्रकार. ही मधमाशी बॉक्समध्ये पॅक करून पाळता येतात.
शेतकर्यांसाठी सर्वच प्रकारच्या मधमाश्या परागीभवनाचे कार्य करीत असल्याने फायदेशीर आहे. त्यांना वाचवले पाहिजे अन्यथा भूतलावरील आपले अस्तित्व टिकणार नाही. आगेमोहोळाच्या मधमाशा टेंभा लावून अथवा विषारी औषधांचा स्प्रे मारून नष्ट करणे हे अत्यंत चुकीचे आहे. एक मधमाश्यांचे पोळ नष्ट करणे म्हणजे एक लाख मधमाश्यांची हत्या करणे होय. ते नष्ट करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला तर त्यापासून उत्कृष्ट मध मिळते.
– हेमंत डुंबरे, मधुमक्षिका अभ्यासक
उद्योजकांना एनओसी देत नाही हा ग्रामस्थांचा आरोप खोटा असून आजपर्यंत २५०० उद्योजकांना एनओसी दिला आहे. जाणीवपूर्वक आरोप केले जात आहे. मधमाश्यांना विषारी औषधांचा स्प्रे मारला असण्याच्या तक्रारीची चौकशी करतो.
– अभिजीत जोंधळे, प्रशासकीय अधिकारी, जीएमाअरटी





